आंतरराष्ट्रीय / व्हॉट्सअ‍ॅप-फेसबुकवर टॅक्स लावल्यामुळे पंतप्रधानांना द्यावा लागला राजीनामा

काही दिवसांपूर्वीच लेबनीज सरकारने मोबाइल मेसेजिंग प्लॅटफॉर्म्सवर कर जाहीर केला.

एएम न्यूज नेटवर्क । लेबनॉनमध्ये व्हॉट्सअॅपवर कर आकारणे सरकारला चांगलेच महागात पडले. या कराच्या विरोधात लेबनीज जनता रस्त्यावर उतरली आणि एवढा तीव्र निषेध केला की पंतप्रधानांनाही राजीनामा द्यावा लागला. काही दिवसांपूर्वीच लेबनीज सरकारने मोबाइल मेसेजिंग प्लॅटफॉर्म्सवर कर जाहीर केला. या घोषणेनंतर लेबनॉनची जनता रस्त्यावर उतरली आणि हिंसाचाराची परिस्थिती निर्माण झाली. निषेध इतका तीव्र झाला की संपूर्ण लेबेनॉनमध्ये अस्थिरता निर्माण झाली. संपूर्ण राजकीय वातावरण ढवळून निघाले.

या करांच्या विरोधात मध्यवर्ती बेरूत आणि इतर शहरांमध्ये लाखो लोकांनी गर्दी केली. सरकारविरोधात आंदोलन करण्यास उत्स्फूर्तपणे सुरुवात केली. हा निषेध अजूनही सुरूच आहे. जनतेची मागणी आहे की, दशकांपासून देशावर राज्य करणाऱ्या नेत्यांना बाहेरचा रस्ता दाखवायला हवा आणि जनकल्याणकारी योजना सुरू केल्या पाहिजेत. तथापि, लेबनॉनची अर्थव्यवस्था कोलमडण्याच्या मार्गावर आहे आणि सरकार कुठूनही का होईना महसूल गोळा करण्यासाठी प्रत्येक पर्याय चाचपडून पाहत आहे. मोबाईल मेसेजिंग अॅपवरील कर हाही त्याच प्रयत्नांचा एक भाग आहे.

लेबनीज सरकारने जाहीर केले की, पहिल्या व्हॉट्सअॅप कॉलवर प्रत्येक वापरकर्त्याकडून 20 टक्के कर आकारला जाईल. या घोषणेमुळे देशभर सरकारविरोधात निषेध तीव्र झाला. फोर्ब्सच्या म्हणण्यानुसार, परिस्थिती अशा टप्प्यावर पोहोचली की पंतप्रधान साद हरिरी यांना मंगळवारी राजीनामा द्यावा लागला. विशेष म्हणजे हरिरीच्या या योजनेला शक्तिशाली शिया संघटना हिज्बुल्लाहनेही पाठिंबा दर्शविला होता. लेबनॉनच्या राजकारणात हिज्बुल्लाहचा हा मोठा हस्तक्षेप मानला जातो.

या निषेधाचा परिणाम शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे आणि बँकांमध्ये दिसून आला. देशातील जवळपास सर्वच आस्थापने अनेक दिवस बंद राहिली. सरकारच्या या लोकविरोधी धोरणाविरोधात जनतेने आवाज उठवावा, असे निदर्शकांनी आवाहन केले. आणि लोकही यात प्रचंड संख्येने सामील झाले. लेबेनॉन बरेच दिवस सर्वकाही जवळपास ठप्प होते. अखेर सरकारला नमते घेऊन हा कर मागे घेण्याची घोषणा करावी लागली. अखेर येथील पंतप्रधानांना राजीनामाच द्यावा लागला आहे. त्यांनी राजीनाम्यासोबत जनतेला शांतता राखण्याचे आवाहनही केले आहे.AM News Developed by Kalavati Technologies