PMC बँकेच्या चौथ्या खातेदाराचा हार्ट अटॅकने मृत्यू, उपचारांसाठी वेळेत पैसे न मिळाल्याचा कुटुंबीयांचा आरोप

पीएमसीचे खातेदार मुरलीधर धारा हे अनेक दिवसांपासून आजारी होते, उपचारांसाठी पैसे न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा दावा त्यांच्या मुलाने केला आहे.

मुंबई । पंजाब आणि महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह (PMC) बँकेत हजारो खातेदारांचे पैसे अडकलेले आहेत. तब्बल 6000 कोटींचा घोटाळा झाल्याची माहिती समोर आली आहे. मागच्या काही दिवसांत 3 बँक खातेदारांचे मृत्यू झाले होते. आज मुरलीधर धारा या चौथ्या खातेदाराचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे.  मृत्युसमयी मुरलीधर धारा यांचे वय 80 वर्षे होते. हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत असून ते अनेक दिवसांपासून आजारी होते. परंतु त्यांच्या उपचारांसाठी पैसे नसल्याचा दावा त्यांच्या मुलाने केला आहे. वेळेत पैसे न मिळाल्याने मानसिक धक्क्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. मुरलीधर यांच्या मुलाचेसुद्धा याच बँकेत खाते असून त्यात 80 लाख रुपये असल्याची माहिती देण्यात आली आहे.

पीएमसीत 6 हजार कोटींचा घोटाळा...
दरम्यान, इंटर्नल चौकशी समितीला एचडीआयएल आणि इतर संबंधित कंपन्यांकडून जारी करण्यात आलेले अनेक चेक मिळाले आहेत. हे चेक बँकेत कधीच जमा करण्यात आले नाहीत. तरीसुद्धा त्यांना पैसे देण्यात आले. तसेच बँकेत झालेला घोटाळा हा 4,355 कोटी रुपयांचा नाही, तर 6500 कोटींहून अधिक असल्याचेही समोर आले आहे. पीएमसी बँकेच्या इंटर्नल चौकशी समितीला जे चेक मिळाले आहे. ते 10 कोटींहून अधिक रक्कमेचे आहेत. तर बाकीच्या 50-55 लाख रुपयांचा काही हिशोब नाही आहे. याशिवाय बँक अधिकाऱ्यांनी सुरुवातीला 4,355 रुपयांचा घोटाळा झाल्याचे सांगितले होते. मात्र, आता या घोटाळ्याचा आकडा वाढला असून 6500 कोटींहून अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे.

पीएमसी बँकेचा माजी संचालक सुरजीतसिंग अरोराला अटक
पीएमसी बँकेचा माजी संचालक सुरजीतसिंग अरोराला बुधवारी आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. याप्रकरणी अटकेत असलेल्या एचडीआयएलचे राकेश वाधवा आणि सारंग वाधवा या पिता-पुत्रासह माजी अध्यक्ष वरियम सिंग कर्तार सिंग यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

इतर संचालकांना लूक आऊट नोटीस
पीएमसी बँकेच्या संशयाच्या भोवऱ्यातील अन्य संचालकांना देश सोडणे शक्य होऊ नये, यासाठी आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी त्यांना लूक आऊट नोटीस जारी केली.AM News Developed by Kalavati Technologies