PNB पेक्षाही मोठा घोटाळा, संदेसरा बंधूंनी बँकांना लावला 15 हजार कोटींचा चुना

ईडीने केलेल्या दाव्यानुसार संदेसरा बंधूंचा घोटाळा हा पीएनबी घोटाळ्यापेक्षा मोठा आहे.

नवी दिल्ली । अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दावा केला आहे की, संदेसरा बंधूंनी केलेला घोटाळा हा पीएनबी घोटाळ्यापेक्षा मोठा आहे. वृत्तसंस्था एएनआयने ईडीच्या सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, स्टर्लिंग बायोटेक लिमिटेड/संदेसरा ग्रुप आणि संचालक नितीन संदेसरा, चेतन संदेसरा आणि दीप्ती संदेसरा यांनी भारतीय बँकांना 14 हजार 500 कोटी रुपयांहून जास्त रकमेला गंडवले आहे.

नीरव मोदीने 11 हजार 400 कोटी रुपयांचा बँक घोटाळा केलेला आहे. याप्रकरणी ऑक्टोबर 2017 मध्ये सीबीआयच्या एफआयआरनंतर ईडीने केस दाखल केली. स्टर्लिंग बायोटेकचे मालक संदेसरा बंधू चेतन जयंतीलाल संदेसरा आणि नितीन जयंतीलाल संदेसरा यांच्यावर बनावट कंपन्या तयार करून बँकांकडून कर्ज घेतल्याचा आरोप आहे. संदेसरा बंधूंविरुद्ध सीबीआयने 5700 कोटी रुपयांच्या फसवणुकीचे प्रकरण नोंदवले होते.

याप्रकरणी स्टर्लिंग बायोटेकसोबतच कंपनीचे संचालक चेतन जयंतीलाल संदेसरा, दीप्ती चेतन संदेसरा, राजभूषण ओमप्रकाश दीक्षित, नितीन जयंतीलाल संदेसरा आणि विलास जोशी, सीए हेमंत गर्ग यांना आरोपी करण्यात आले होते.

संदेसरा बंधू फरार असून ईडीने लूकआउट नोटीसही जारी केली होती. सीबीआयच्या एफआयआरनुसार संदेसरा बंधूंची कंपनी स्टर्लिंग बायोटेकने आंध्रा बँकेच्या नेतृत्वाखालील बँक समूहाकडून 5000 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. ते फेडले नसल्याने एनपीएमध्ये गेले.

संदेसरा बंधू गायब

संदेसरा बंधू कुठे आहेत हे अद्याप कळलेले नाही. भारत सरकार सध्या नीरव मोदी आणि मेहुल चोकसीच्या प्रत्यार्पणाचे प्रयत्न करत आहे. पण आता संदेसरा बंधूंना शोधून काढण्याचेही आव्हान मोठे असणार आहे.AM News Developed by Kalavati Technologies