अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व पंतप्रधान मोदींची भेट; इराण, 5जीसह 4 मुद्द्यांवर झाली चर्चा

ओसाकामध्ये अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली.

ओसाका (जपान) । ओसाकामध्ये अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली. या भेटीत पंतप्रधान मोदींनी अमेरिकेसोबत इराण, 5G आणि दोन्ही देशांमधील संबंध आणि सुरक्षाविषयक मुद्द्यांवर चर्चा होईल, असे स्पष्ट केले. जपानच्या ओसाका येथे जी २० परिषद सुरू झाली आहे. या परिषदेत डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली.

भारताने लादलेले आयात कर मान्य नसल्याचं वक्तव्य डोनाल्ड ट्रम्प यांनी कालच केलं होतं. डोनाल्ड ट्रम्प त्या विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करणार आहेत. दरम्यान, या भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांचे आभार मानले. मोदी म्हणाले, माझ्या दुसऱ्या टर्मच्या सुरुवातीलाच तुमची भेट होते आहे हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे. भारतात जेव्हा निवडणुका झाल्या त्यानंतर लागलेल्या निकालानंतर आपण मला फोन करून माझं अभिनंदन केलंत त्यासाठीही मी तुमचा आभारी आहे, असंही मोदींनी म्हटलं आहे. अमेरिकेला भारताशी चांगले संबंध ठेवायचे आहेत, ट्रम्प यांचे भारतावर प्रेम आहे हेच तुम्ही तुमच्या कृतीतून दाखवून दिले असल्याचे मोदी म्हणाले.

यावेळी ट्रम्प म्हणाले की, भारत हा अमेरिकेचा चांगला मित्र आहे. यापूर्वी जे कधीही झाले नव्हते ते तुमच्यामुळे शक्य झाले. तुम्ही भारतात झालेल्या निवडणुकांमध्ये जे यश मिळवले ते अभूतपूर्व आहे. ते तुम्हाला मिळणार होतेच कारण तेवढी तुमची क्षमता आहे. मला आठवते आहे की आपली पहिली भेट झाली तेव्हा काही गट होते जे आपसात लढत होते. आता मात्र ते एकमेकांसोबत आहेत. हे तुमचे यश आहे, असेही ट्रम्प यांनी म्हटलं आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी व्यापारविषयक चर्चा होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.



AM News Developed by Kalavati Technologies