शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्त करून त्यांचा सातबारा कोरा करू - आदित्य ठाकरे

राम मंदिर होणार म्हणजे होणार धुळ्यात आदित्य ठाकरे यांची घोषणा

धुळे । गेल्या काही वर्षात बेरोजगारी वाढली आहे. दुष्काळामुळे अनेक शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागल्या आहेत. मात्र, आता हे चित्र बदलवायच असून, नवा महाराष्ट्र घडविण्याचे माझे स्वप्न आहे. आगामी काळात बेरोजगारीमुक्त, दुष्काळमुक्त, प्रदुषणमुक्त, कर्जमुक्त तसेच सुजलाम सुफलाम महाराष्ट्र घडवणार असल्याचे प्रतिपादन युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी येथे केले. शिवसेना, भाजप, रिपाई युतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ दत्त मंदिर चौकात झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.

आदित्य ठाकरे म्हणाले, गेल्या काही महिन्यापूर्वी महाराष्ट्र भर दौरे केले. तेव्हा राज्यातील बेरोजगारी, दुष्काळ, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, प्रदूषण आदि समस्या लक्षात आल्या. हे चित्र बघून तेव्हाच निवडणूक लढवून विधानसभेत जाण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्र ही माझी भूमी असून, प्रत्येक मतदार संघ हा माझा मतदारसंघ आहे. युती सत्तेत आल्यानंतर बेरोजगारीमुक्त, दुष्काळमुक्त, प्रदूषणमुक्त महाराष्ट्र घडवणार आहे. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्त करून त्यांचा सातबारा कोरा करू असे आश्वासन त्यांनी दिले.

आरोग्याच्या समस्या सोडविण्यासाठी धुळ्यासह प्रत्येक जिल्ह्यात मेडीकल कॉलेज, फिरता दवाखाना, फिरते आॅपरेशन थिएटर सुरू करू. राज्यात सर्वत्र दर्जाचे शिक्षण देण्याचा आपला प्रयत्न असेल. शिवसेना जे बोलते ते करून दाखविते असे त्यांनी सांगितले.AM News Developed by Kalavati Technologies