रासप प्रवेशावर अभिनेता संजय दत्तने दिले 'हे' उत्तर, मंत्री जानकरांनी केला होता दावा

जानकरांनी रविवारी दावा केला होता की, संजय दत्तने रासपमध्ये प्रवेशासाठी सप्टेंबर महिन्याची तारीख दिली आहे.

मुंबई । बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता संजय दत्तने त्याच्या राजकारणातील प्रवेशावर सुरू असलेल्या विविध चर्चांना विराम दिला आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष मंत्री महादेव जानकर यांनी लवकरच संजय दत्त आपल्या पक्षात प्रवेश करणार असल्याचे वक्तव्य केले होते. यावर माध्यमांनी संजूबाबाला विचारले असता, संजय म्हणाला की, मी कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नाहीये. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर माझे चांगले मित्र आहेत. माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत.

तत्पूर्वी, जानकरांनी रविवारी दावा केला होता की, संजय दत्तने रासपमध्ये प्रवेशासाठी सप्टेंबर महिन्याची तारीख दिली आहे. रासपचा 16 वा वर्धापन सोहळा मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी जानकरांनी हा दावा केला होता.

रविवारी दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर राष्ट्रीय समाज पक्षाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. तेव्हा जानकर यांनी प्रचंड शक्तिप्रदर्शन केलं. याप्रसंगी महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडेही उपस्थित होत्या.AM News Developed by Kalavati Technologies