लाल किल्ला हिंसाचारप्रकरणी आरोपी दीप सिध्दूवर पोलीसांकडून एक लाखांचं बक्षीस

प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील लाल किल्ला परिसरात हिंसाचार घडला होता. त्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

नवी दिल्ली । दिल्लीत प्रजासत्ताक दिनी घडलेल्या हिंसाचाराप्रकरणी आरोपी दीप सिध्दू याची माहिती देणाऱ्याला दिल्ली पोलीसांनी एक लाख रुपयांचा बक्षीस घोषित केलं आहे. पोलीसांनी दीप सिध्दू, जुगराज सिंह, गुरजोत सिंह आणि गुरजंत सिंह यांच्या विषयी माहिती देणाऱ्याला एक लाखाचं बक्षीसाची घोषणा केली आहे. तर जाजबीर सिंह, बूटा सिंह, सुखदेव सिंह आणि इकबाल सिंह यांना अटक करण्यासाठी प्रत्येकी 50 हजार रुपये बक्षीस देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

नव्या तीन कृषी कायद्याविरोधात 26 जानेवारी रोजी दिल्लीत मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. त्याप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. प्रजासत्ताक दिनी आंदोलनकर्त्यांना लाल किल्यावर धार्मिक झेंडा लावण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे 27 जानेवारीला याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. आज याची सुनावणी होणार आहे.

दरम्यान, केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीत विविध सीमाभागांवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरुच आहे. शेतकरी आंदोलनाचा आज 70 वा दिवस आहे. शेतकरी आपल्या मागणीवर ठाम असून, जो पर्यंत नवीन कृषी कायदे रद्द केले जात नाही. तो पर्यंत आंदोलन सुरुच राहणार असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं आहे. केंद्र सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये आतापर्यंत 11 वेळा बैठकी झाल्या मात्र, त्यात कोणत्याही तोडगा निघालेला नाही.

6 फेब्रुवारीला शेतकऱ्यांनी देशभरात 'चक्काजाम' आंदोलनाची हाक दिली असून, पोलीसांनी दिल्लीच्या सीमांवर सुरक्षा वाढवली आहे. आंदोलनस्थळी दिल्ली पोलीसांनी रस्त्यांवर धारदार खिळे आणि बॅरिकेट्सची भींत तयार करण्यात आली आहे. सोबतच इंटरनेट सेवा सुद्धा बंद करण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनी घडलेल्या हिंसाचाराप्रकरणी, दिल्ली पोलीसांनी आतापर्यंत 12 संशयित जणांचा फोटो जारी केला आहे. पोलीसांचं म्हणणं आहे की, या लोकांनी ट्रॅक्टर रॅली दरम्यान हिंसा भडकवली होती.AM News Developed by Kalavati Technologies