सेल्फी घेण्याच्या नादात धबधब्यात पडून तरुणाचा मृत्यू

देशसेवेचे स्वप्न राहिले अधुरे...

सोयगाव | तालुक्यातील धारकुंड येथील धबधब्याजवळ सेल्फी घेण्याच्या नादात पाय घसरून खोल पाण्याच्या कुंडात पडल्याने एका 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी घडली. तब्बल चौदा तासांच्या अथक परिश्रमानंतर मंगळवारी तरुणाचा मृतदेह सापडला असून तरुणाचे नाव अविनाश राजू पवार (वय 21, रा. वाकी, ता. कन्नड) असे आहे.

बनोटी गावापासून सात किलोमीटर अंतरावर धारकुड हे धार्मिक स्थळ आहे. या ठिकाणी तीनशे फुटांवरून कोसळणारा धबधबा पर्यटक, भाविकांचे आकर्षण ठरत आहे. बाजूला खडकाच्या कपारीमध्ये महादेवाची पिंड आहे. धो-धो कोसळणार्‍या धारेखाली अंघोळ केल्याने पुत्रप्राप्ती होत असल्याची श्रद्धा आहे. श्रावण महिन्यात नेहमी भाविकांची याठिकाणी गर्दी होत असते. परिसरासह घाटमाथ्यावरील तरुण मोठ्या प्रमाणात पर्यटन तसेच दर्शनासाठी येतात. वाकी येथील तरुण अविनाशदेखील सोमवारी मित्रासोबत धारकुंड येथे आल्यावर तीनशे फुटांवरून कोसळणार्‍या धबधब्याजवळ सेल्फी घेण्याचा मोह आवरता आला नाही. सेल्फी घेण्यासाठी मागे-पुढे सरकताना त्याचा पाय घसरला आणि खोलकुंडामध्ये जाऊन पडला. बराच वेळ होऊनदेखील अविनाश पाण्यावरती आलाच नसल्याने काही तासांनंतर जवळपास दहा ते वीस तरुणांनी कुडांमध्ये उतरून अविनाशचा शोध घेतला. परंतु तो सापडला नाही. रात्र झाल्यानंतर जंगलात कोणतीही उजेडाची व्यवस्था नसल्याने तरुण माघारी परतले. मंगळवार (ता. १३) सकाळपासून शोध घेण्यात आला. अकरा वाजता अविनाशचा मृतदेह सापडला. मृतदेह बनोटी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणीसाठी आणल्यावर आरोग्य अधिकारी नसल्याने मृतदेह चिंचोली येथे नेण्यात आला. प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणी करून वाकी येथील स्मशानभूमीमध्ये दुपारी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, एक बहीण असा परिवार आहे. अविनाश हा एकुलता एक मुलगा होता. त्याचे असे दुख:द निधन झाल्याने गावात शोककळा पसरली आहे. सोयगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक शेख शकील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे अंमलदार सुभाष पवार, कौतिक सपकाळ, दीपक पाटील, प्रदीप पवार आदी करत आहेत.

देशसेवेचे स्वप्न राहिले अधुरे...
अविनाश वयाच्या पंधरा वर्षांपासून लष्करात भरती होऊन देशसेवा करण्याचे स्वप्न होते. सैन्यदलात भरती होण्याचे स्वप्न पाहत असल्याने व अठरा वर्षे पूर्ण झाल्याने लष्कराच्या अनेक ठिकाणी झालेल्या भरती प्रक्रियेत सहभागीही झाला होता. या अचानक झालेल्या दुर्घटनेने त्याचे देशसेवेचे स्वप्न अधुरेच राहिले.AM News Developed by Kalavati Technologies