पुणे । राज्यात महाविकासआघाडीचे सरकार सत्तेत आल्यावर पुण्याचे पालकमंत्रिपद राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांकडे जाण्याची चर्चा सुरु झाली आहे. अजित पवार पुण्याचे कारभारी झाल्यावर पुन्हा एकदा पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा फडकेल असा विश्वास राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व्यक्त करत आहे. दरम्यान, अजित पवारांसोबत या शर्यतीत पक्षातील जेष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांच्याही नावाची चर्चा असल्याचे बोललं जात आहे.
पुण्याच्या कारभाऱावरून राज्याच्या राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चा असते. गेल्या पाच वर्षात गिरीश बापट यांच्याकडे पुण्याचा कारभार होता. तर त्यापूर्वी अजित पवार यांनी पुण्याचा कारभार पाहिला आहे. मात्र, बापट केंद्रात गेल्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुण्याचे पालकमंत्रिपद जाईल अशी शक्यता होती. मात्र, सत्ता गेल्यामुळे पाटलांची ही संधी हुकली. यामुळे अजित पवार यांची पुन्हा एकदा पालकमंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.
तर दुसरीकडे पुणे जिल्ह्यातील राजकारणात दिलीप वळसे-पाटील यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. वळसे पाटील यांचा अनुभव पाहता त्यांची पालकमंञी पदी नियुक्ती होण्याची शक्यता आहे. शिरुर लोकसभा मतदार संघातील जेष्ठ नेते, विधानसभेचे माजी अध्यक्ष, तसेच सात वेळा आंबेगाव विधानसभेचे आमदार असलेले दिलीप वळसे पाटील यांचा अनुभव पाहता त्यांची पालकमंञी पदी नियुक्ती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुण्याच्या पालकमंञी पदी नक्की कोणाची वर्णी लागते याकडे संपुर्ण पुणे जिल्हासह राज्याचे लक्ष लागले आहे.