भारतात टोळधाडीचे हल्ले वाढण्याचं नेमकं कारण काय? कसा करता येईल सामना, जाणून घ्या सोप्या भाषेत...

पाकिस्तानमधून आलेल्या टोळधाडीनं भारतातील अनेक राज्यांवर हल्ला केला आहे.

डेस्क स्पेशल | (सतिश दौड पाटील) एकीकडे कोरोनाचं संकट असतांना दुसरीकडे देशावर आणखी एक नवीन समस्या उद्भभवली आहे. पाकिस्तानमधून आलेल्या टोळधाडीनं भारतातील अनेक राज्यांवर हल्ला केला आहे. या टोळधाडीने पंजाब, राजस्थान आणि मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांची शेती पिके नष्ट केली आहेत. टोळधाड नावाच्या या नाकतोड्यांचा देशात दिवसेंदिवस प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. मात्र हे टोळधाड नावाचे नाकतोडे नेमके आहे तरी काय, शेतीपिकांबरोबरच ते मानव जातीला सुद्धा घातक ठरु शकतात का? त्यांना कशा प्रकारे आळा घालता येऊ शकतो? याचीच माहिती आपण जाणून घेणार आहोत.

असे पोहचले भारतात

गेल्या 20 वर्षांपासून हे टोळधाड भारतात येऊन शेतीपिकांवर हल्ला करत आहे. गेल्या वर्षीही या नाकतोड्यांनी भारतातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. सर्वप्रथम 1993 मध्ये देशावर टोळधाडांचा सर्वात मोठा हल्ला झाला होता. त्यानंतरच्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात हे टोळ नावाचे नाकतोडे भारतात दाखल होत आहे. मात्र सरकारच्या सतर्कतेमुळं यामधून जास्त नुकसान झालं नाही. यावर्षी मात्र हे टोळ इराण तसेच पाकिस्तानमार्गे भारतात दाखल झाले आहे. भारतात दाखल झाल्यानंतर प्रथम त्यांनी पंजाब आणि राजस्थानमधील पिकांचे नुकसान केले आणि आता त्यांनी आपला मोर्चा झाशीकडे वळवला आहे.

जगातील सर्वात धोकादायक कीटक

जगभरात टोळांच्या 10,000 हून अधिक प्रजाती आढळतात, परंतु भारतात केवळ चार प्रजाती आढळतात. यामध्ये वाळवंटातील टोळ, स्थलांतरित टोळ, बॉम्बे टोळ व वृक्ष टोळ यांचा समावेश आहे. त्यापैकी वाळवंटातील टोळ सर्वात धोकादायक मानले जातात. हिरव्या कुरणात येताना हे आणखी जास्त धोकादायक बनतात असं तज्ञांचं म्हणणं आहे. कृषी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जगातील दहा टक्के लोकसंख्या वाळवंटातील टोळांनी प्रभावित केली आहे.

अनेक देशांमध्ये टोळांना मोठ्या चवीनं खाल्ले जाते

कृषी तज्ज्ञांच्या माहितीनुसार कोणत्याही प्रकारचे टोळ म्हणजेच नाकतोड्यांपासून मानवी जीवनाला हानिकारक नाही. या नाकतोड्यांमुळं मानवांचे काही शारिरीक नुकसान होत नाही. तसेच हे टोळ माणसाला चावत नाही. परंतु त्यांच्याबरोबर सावधगिरी बाळगणे महत्वाचे आहे. ते फक्त पिके आणि वनस्पतींची शिकार करतात. त्याचबरोबर या टोळांचा वापर जगातील बर्‍याच देशांमध्ये अन्न म्हणून केला जातो. व्हिएतनाम, ब्राझील आणि कंबोडियासारख्या देशांमध्ये ते मोठ्या उत्साहाने खाल्ले जातात.

टोळधाडांमध्ये अशा प्रकारे होते वाढ

टोळधाडीची प्रजाती मोठ्या संख्येने वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे ग्लोबल वार्मिंगमुळे हवामानातील झालेल बदल. तज्ञांचे म्हणणे आहे की मादी तळमळीने एकावेळी तीन अंडी आणि साधारण 95-158 पर्यंत अंडी घालू शकतात. टोळांच्या चौरस मीटरमध्ये एक हजार अंडी असू शकतात. त्यांचे आयुष्य तीन ते पाच महिने आहे. नर टोळांचा आकार 60-75 मिमी आणि मादी 70-90 मिमी असू शकतो.

आर्द्रता असलेल्या भागात सर्वाधिक धोका

दिल्लीतील यमुना बायोडायव्हर्सीटी पार्कचे मोहम्मद फैजल यांच्या म्हणण्यानुसार वाळवंटातील टोळ सर्वात धोकादायक असतात. साधारणता: हे टोळ वाळूमध्ये अंडी देतात, परंतु जेव्हा ते अंडी फोडतात तेव्हा ते अन्नाच्या शोधात आर्द्र भागाकडे जातात. यामुळे ओलसर भागात टोळांचा धोका अधिक वाढतो. हे टोळ एका दिवसात जवळपास 35 हजार लोकांना पुरेल एवढं धान्य खाऊ शकतात. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेच्या मते, वाळवंटातील टोळांचा वेग ताशी 16 ते 19 किमी आहे. जर हवेचा वेग त्यांच्याबाजूने असेल तर ह्या टोळधाडांचा वेग आणखीच वाढतो. अशा प्रकारे, ते एका दिवसात 200 किमी प्रवास करू शकतात. संस्थेच्या मते, एका चौरस किलोमीटर भागात पसरलेल्या संघात सुमारे चार कोटी टोळ राहतात.

हल्ले वाढण्याचे कारण काय?

टोळांवर प्रसिद्ध झालेल्या नवीन अहवालात असे म्हटले आहे की त्यांची संख्या आणि हल्ले वाढण्यामागील मुख्य कारण म्हणजे अवेळी पाऊस. गेल्या एक वर्षात भारत आणि पाकिस्तानसह संपूर्ण अरबी द्वीपकल्पात अवकाळी पाऊस पडत आहे. यामुळे ते ओलावामुळे वेगाने पसरतात. तज्ञांच्या मते, पहिल्या प्रजनन काळात टोळ 20 वेळा वाढतात, दुसऱ्या वेळात त्यांचा गुणाकार होतो. आणि त्यांची संख्या 400 पर्यंत पोहचते. त्यानंतर त्यांचा गुणाकार वाढत जातो आणि त्यांची संख्या 1600 पर्यंत जाते.

टोळ किती नुकसान करतात

दोन महिन्यांपूर्वी, जेव्हा टोळधाडीने भारतावर हल्ला केला तेव्हा गुजरात आणि राजस्थानमधील 1.7 लाख हेक्टर क्षेत्रात तेल बियाणे, जिरे आणि गहू पिकाचे नुकसान झाले. लवकरच टोळांवर नियंत्रण न ठेवल्यास आठ हजार कोटी रुपयांचे मुगाचे पीक उध्वस्त होऊ शकते, असे तज्ज्ञांनी सांगितले.

अशा प्रकारे सामना केला जाऊ शकतो

तज्ञांच्या मते टोळधाडीच्या नुकसानापासून बचाव करण्यासाठी शेतीवर विशेष लक्ष दिल्या गेले पाहिजे. टोळधाडीला वेळेवर जर नियंत्रण घातले गेले तर होणारे नुकसान आपण टाळू शकतो. याव्यतिरिक्त कीटकनाशकांचे हवाई फवारणी करता येते, पण भारतात या सुविधेचा अभाव आहे. त्याचप्रमाणे या टोळांची अंडी वाढण्यापूर्वी ती नष्ट केली जाऊ शकतात.AM News Developed by Kalavati Technologies