धक्कादायक! गर्भातच बाळाला झाली कोरोनाची लागण, पुण्यात घडली देशातील दुर्मिळ घटना

पुण्यात घडलेली ही घटना अत्यंत दुर्मिळ आणि देशातील पहिलीच घटना आहे.

पुणे | देशभरात कोरोना आजाराने थैमान घातलं असतांना आता एक महत्वाची आणि दुर्मिळ घटना पुण्यातून समोर आली आहे. आईच्या गर्भात असतांनाच बाळाला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. पुण्यात घडलेली ही घटना अत्यंत दुर्मिळ आणि देशातील पहिलीच घटना आहे. यापूर्वी बाळाला प्रसुतीनंतर कोरोनाचा संसर्ग झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र, गर्भात असतानाच कोरोनाचा संसर्ग झाल्याची ही देशातील पहिली घटना असल्याचं ससूनच्या अधिष्ठातांनी म्हटलं आहे. इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार हडपसर परिसरात राहणारी एक 22 वर्षीय गर्भवती महिला नुकतीच पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल झाली होती. यादरम्यान महिलेची आरटी-पीसीआरद्वारे कोरोना चाचणी करण्यात आली. त्यावेळी सदरील महिलेचा कोरोना चाचणी रिपोर्ट निगेटिव्ह आला. त्यानंतर अॅण्टीबॉडी टेस्ट करण्यात आली, त्यात महिलेला कोरोना असल्याचं निदान झालं असल्याची माहिती बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयातील बालरोगशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. आरती किणीकर यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिली. या दरम्यान गर्भात असलेल्या बाळाला अनेक लक्षण दिसून आली होती आणि त्याच्यावर उपचार करण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागले, हे सगळं खूप आव्हानात्मक होतं, असंही डॉ. आरती किणीकर यांनी यावेळी बोलतांना सांगितलं आहे.

दरम्यान या बाळाचा जन्म झाल्यानंतर नाकातील स्वॅब घेण्यात आला. त्याचबरोबर नाळ आणि नाभीच्या तपासणीनंतर त्याला कोरोना झाल्याचं निष्पन्न झालं. बाळाची आरटी-पीसीआरद्वारे कोरोना चाचणी करण्यात आली होती. बाळाला 24 ते 48 तासाच्या आतच लक्षणं दिसून आली. तापासह कोरोनाची अनेक लक्षणं बाळामध्ये दिसून आली. बाळाची नाभी आणि नाळातील संसर्ग ओळखण्यास सक्षम होतो. आईलाही संसर्ग झालेला होता, मात्र त्याची काही लक्षणं दिसत नव्हती,” असं किणीकर म्हणाल्या. “या केस संदर्भातील आमचा रिसर्च पेपर प्रकाशित करण्यासाठी अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय जर्नलकडे पाठवला होता. तो स्वीकारण्यात आला आहे. त्याचं स्वीकृती पत्रही काल रात्री आम्हाला मिळालं आहे,” अशी माहिती किणीकर यांनी दिली.AM News Developed by Kalavati Technologies