Maharashtra Bandh : वंचितच्या बंदला संमिश्र प्रतिसाद, सोलापुरात बसची तोडफोड

Live Updates: मुंबई, नागपूर व इतर शहरात रास्ता रोको करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांनी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

एएम न्यूज नेटवर्क । वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला राज्यभरात संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले होते. परंतु सोलापुरात बसची तोडफोड झाल्याने बंदला हिंसक वळण लागल्याचे समोर आले आहे. विविध शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुंबई, नागपूर व इतर शहरात रास्ता रोको करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांनी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

केंद्र सरकारने पारित केलेल्या नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या(एनआरसी) विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शुक्रवारी महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले. वंचितच्या या बंदला राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत असल्याचा दावा ज्येष्ठ नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. वंचितच्या वतीने पुकारण्यात आलेल्या या बंदमध्ये एकूण ३५ संघटना सहभागी होणार असल्याचेही ते म्हणाले.

Live Updates :

उमरी (नांदेड) । NRC ,CAA वंचित आघाडी च्या तर्फे महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली त्याच पार्श्वभूमीवर उमरी मध्ये NRC CAA ला आमचा काहि विरोध नाही म्हणून व्यापाऱ्यांनी रात्री पोलीस स्टेशन उमरी यांना निवेदन दिले व आज मुख्य मोंढा बाजारपेठ पूर्णतः चालू आहे. आम्ही मार्केट बंद करणार नसल्याचा पवित्रा व्यापाऱ्यांनी घेतला त्या पार्श्वभूमीवर आताच वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्ते आणि मुस्लिम संघटनांची एक मीटिंग बसवण्यात आली होती, त्या मीटिंगमध्ये काय चर्चा झाली, हे मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे. त्यामुळे मार्केटमध्ये मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

कर्जत (अहमदनगर) । कर्जतमध्ये कडकडीत बंद
बहुजन वंचित आघाडीच्या वतीने कर्जत बंदचे आवाहन करण्यात आले होते, त्यामुळे आज कर्जत शहरातील सर्व व्यवहार पूर्णपणे ठप्प होते. सकाळपासून सर्व दुकाने बंद होती.

परळी । परळीत नागरिकत्व कायद्याविरोधात कडकडीत बंद..!

नागरिकत्व कायद्याविरोधात आज बंदची हाक देण्यात आलीये. याच पार्श्वभूमीवर बीडच्या परळीमध्ये बाजारपेठा कडकडीत बंद ठेवत, या बंदला पाठिंबा देण्यात आला. परळी शहरातील मोंढा, टॉवर चौक आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकातील मुख्य बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत. थोड्याच वेळात वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून नागरिकत्व कायद्याविरोधात निदर्शने करणार आहेत. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चोख असा बंदोबस्त शहरात ठेवण्यात आलाय.

बीड,वडवणी । वंचित च्या महाराष्ट्र बंद ला वाडवणीत उत्स्फूर्त प्रतिसाद
केंद्र शासनाने NRC CAA कायदा लागू केल्यानंतर वंचित बहुजन आघाडीने आज संपूर्ण महाराष्ट्र बंद ची हाक दिली होती या बंद मध्ये वडवणी शहरातील व्यापाऱ्यांनी आज उत्स्फूर्त सहभाग नोंदवला शहरातील शाळा महाविद्यालय वगळता इतर ठिकाणी हा बंद कडकडीत पाळण्यात आला. काल वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शहरातील बाजारपेठेत रॅली काढून बंद मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते त्यामुळे व्यापाऱ्यांनी आज सकाळपासूनच आपली दुकाने बंद ठेऊन यामध्ये सहभाग नोंदवला होता.

वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांचा सायन - ट्रोम्बे रोड येथे रास्ता रोको करण्यात आला.

नवी मुंबई - केंद्र सरकार लागू करीत असलेल्या सीएए, एनआरसीला असलेला विरोध आणि फसलेले आर्थिक धोरण याविरोधात वंचित बहुजन आघाडी कडून आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदमध्ये आपल्या पक्षाबरोबर इतर काही संघटना सामील असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे. राज्यव्यापी बंदची हाक देण्यात आली असली तरी याचा कोणताही परिणाम नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केट वर झालेला नाही. राज्यातील विविध जिल्ह्यातून तसेच परराज्यातील कर्नाटक , तामिळनाडू, गुजरात मधून मोठ्या प्रमाणात भाजीपाला गाड्यांची आवक एपीएमसीत झाली आहे. आवकीत वाढ झाल्याने भाज्यांचे भावसुद्धा स्थिर आहेत.

- सोलापूरात बाळीवेस येथे तरटी नाका येथे समाजकंटकांनी बस फोडली. वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदचा सोलापूर शहरावर परिणाम झाला असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे रहदारीच्या रस्त्यावर शुकशुकाट दिसून येत असून बाळीवेस परिसरात समाजकंटकांनी सिटी बसची काच फोडल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
- वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज सकाळपासून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. त्याच पार्श्वभूमीवर पैठण तालुक्यातील पाचोड येथे संपूर्ण मार्केटमध्ये कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे.

सीएएला विरोध करत अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ढासळलेल्या अर्थव्यवस्थेसाठी मोदी सरकारला जबाबदार ठरवून टीका केली आहे. जनतेचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न होत असून देशभरात भावनेचे राजकारण करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले. नागरिकत्व कायद्याला विरोध होत असताना, हा कायदा लागू करणारच, अशी भूमिका शाह मांडत असून हे दुर्दैवी आहे, असेही ते म्हणाले.

तथापि, राज्यव्यापी बंददरम्यान अनुचित प्रकार टाळण्यासाठी प्रशासन व पोलिस सज्ज आहेत. बंददरम्यान कुणीही गोंधळ घालू नये, सर्वसामान्य व व्यापाऱ्यांना त्रास होणार नाही तसेच सरकारी वा खासगी मालमत्तेचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन वंचितच्या वतीने करण्यात आलेले आहे.

वंचित बहुजन विकास आघाडीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला आज बारामतीत चांगला प्रतिसाद मिळाला. आज सकाळी बारामतीची बाजारपेठ बंद होती. नागरिकत्व सुधारणा कायदा व एनआरसी व खासगीकरणाला विरोध म्हणून प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. बारामतीत आज बाजारपेठ सकाळी बंद होती. बंद शांततेत पार पडला. पोलिसांनी ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. अत्यावश्यक सेवा वगळता बंदला चांगला प्रतिसाद मिळाला.

नागरिकत्व कायद्याविरोधात आज निलंगा कडकडीत बंद..!

नागरिकत्व कायद्याविरोधात आज बंदची हाक देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर निलंगा बाजारपेठा कडकडीत बंद ठेवत, या बंदला पाठिंबा देण्यात आला. निलंगा शहरातील मुख्य बाजारपेठा, दुकाने बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्याच प्रमाणे एस टी बसेसच्या गाड्या ही बंद होत्या. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा चोख असा बंदोबस्तही ठेवण्यात आलाय.AM News Developed by Kalavati Technologies