सरकारी बैठकीत ठाकरेंचे पाहुणे! वरुण सरदेसाईंच्या उपस्थितीमुळे नवा वाद

वरुण सतीश सरदेसाई हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंच्या बहिणीचे सुपुत्र आहेत.

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आयोजित केलेल्या सरकारी बैठकीला आदित्य ठाकरे यांचे मावसभाऊ आणि युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांची हजेरी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या बैठकीत सरदेसाई यांचे फोटो व्हायरल झाले. यानंतर हा प्रकार उघडकीस आला. वरुण सरदेसाई यांच्याकडे युवासेनेचं सचिवपद आहे. तरी ते ना लोकप्रतिनिधी आहेत, ना सरकारी अधिकारी आहेत. त्यामुळे पर्यटन विषयक बैठकीला सरदेसाईंनी हजेरी लावल्यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

कोणत्याही शासकीय पदावर नसताना वरूण देसाई बैठकीत उपस्थित राहिल्याने वाद निर्माण झाला आहे. मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीनंतर म्हणजेच 28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या बैठकीला सरदेसाई उपस्थित होते. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी वरूण देसाई यांचा बैठकितील फोटो ट्विट करून वरुण सरदेसाई राज्य शासनाच्या सचिवांच्या बैठकीत काय करत आहेत? तेही मंत्रालयात, असा सवाल उपस्थित केला आहे.

वरुण सतीश सरदेसाई हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंच्या बहिणीचे सुपुत्र आहेत. वरुण सरदेसाई यांच्याकडे युवासेनेच्या सचिवपदाची जबाबदारी आहे. यासोबतच वरुण यांच्याकडे शिवसेनेच्या आयटी सेलचीही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवावी, अशी जाहीररित्या सर्वप्रथम मागणी वरुण यांच्याकडूनच करण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीच्या वेळी वरुण सरदेसाई हे शिवसेनेचे स्टार प्रचारक होते. आदित्य ठाकरेंच्या जनआशीर्वाद यात्रेच्या नियोजनामध्येही वरुण सरदेसाई यांचा मोठा सहभाग होता. 2017 मधील कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीतही त्यांनी महत्त्वाची जबाबदारी पेलली होती. 2014 मधील लोकसभा निवडणुकीत श्रीकांत शिंदेंसाठी त्यांनी प्रचार केला होता.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावले होते. यामुळे आपण बैठकीला उपस्थित राहिलो होतो, असे स्पष्टीकरण वरुण सरदेसाई यांच्याकडून देण्यात आले आहे. मात्र आता मुख्यमंत्र्यांनी वरूण देसाईंना का बोलावून घेतलं याचं स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे.AM News Developed by Kalavati Technologies