विद्यापीठ व महाविद्यालयाच्या सत्र परीक्षा स्थगित करून यंदा केवळ वार्षिक परीक्षा घ्यावी

माजी उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री डी.पी.सावंत यांची मागणी

मुंबई । विद्यापीठ व महाविद्यालयांच्या परीक्षा घेण्यावरून आणि शैक्षणिक वर्ष सुरू करण्यावरून केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि राज्याच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाची चांगलीच झुंपली आहे. यूजीसीने परीक्षा घेण्याचे आदेश दिल्यानंतर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता परीक्षा घेणे योग्य नसल्याचे सांगत नकार दिला होता. तर विद्यापीठांना यूजीसीच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक असल्याचं विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष डॉक्टर भूषण पटवर्धन यांनी सांगितले होते. यावरून उडालेल्या गोंधळात आता राज्याचे माजी उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री डी.पी. सावंत यांनी सुवर्णमध्ये काढून यंदा फक्त वार्षिक परीक्षाच घ्या, सत्र परीक्षा स्थगित करा अशी मागणी लेखी पत्राद्वारे केली आहे.

देशात वाढलेला कोरोनाचा संसर्ग आणि त्यामुळे प्रत्यक्ष बंद असलेली महाविद्यालय पाहता अशा वेळी सत्र परीक्षा स्थगित करून त्याऐवजी केवळ वार्षिक परीक्षा घेण्यात यावी अशी मागणी राज्याचे माजी उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री डी.पी. सावंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत व विद्यापीठ अनुदान आयोगाकडे एका लेखी पत्राद्वारे केली आहे.कोरोनामुळे शिक्षणावर झालेला परिणाम हा चिंतेचा विषय असून उच्च शिक्षणाशी संलग्न असलेल्या संस्थांची कामे सध्या बंद आहे व ऑनलाइन शिक्षणामद्धे बऱ्याच उणिवा आहेत.

या पद्धतीतून विद्यार्थी योग्य प्रमाणात ज्ञानसंग्रह करू शकणार नाही त्यामुळे अशावेळी परीक्षा प्रणालीत बदल करणे गरजेचे असल्याच मत त्यांनी मांडले आहे. शैक्षणिक वर्ष सुरू होऊन दोन महिने लोटले आहेत परंतु, अद्यापही महाविद्यालयांमध्ये अध्यापनाचे काम होत नसल्याने पुढील काही काळ महाविद्यालयात प्रत्यक्ष अध्यापन सुरू करणे अशक्य आहे, जर विद्यार्थ्यांना शिकविलेच नसेल तर विद्यार्थी परीक्षा कशा देणार? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे कोविड-19 च्या काळात सत्र परीक्षा स्थगित करून त्याऐवजी वार्षिक परीक्षा घेण्यात याव्यात जेणेकरून येणाऱ्या काळात प्रतिकूल आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करत शैक्षणिक प्रगती साधता येणं शक्य होईल असेही त्यांनी पत्रात नमूद केलं आहे.AM News Developed by Kalavati Technologies