सर्वसमावेशक-मनमिळावू नेतृत्वाचा अस्त - अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार

सर्वांना सोबत घेऊन जाण्याच्या त्यांच्या भुमिकेमुळे जीएसटीची अंमलबजावणी यशस्वी

मुंबई । माजी अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या निधनाने देशपातळीवर सर्वसमावेशक विचार करणारं, मनमिळावू, मुत्सदी, प्रचंड विद्वान असं जेष्ठ नेतृत्व काळाने आपल्यातून हिरावून घेतलं आहे. ही राष्ट्राची मोठी हानी आहे. एक मोठा आधारवड आज हरवला आहे अशा शब्दात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

पेशाने वकिल असलेले अरूण जेटली हे अतिशय विनम्र, अभ्यासू व्यक्तिमत्त्वाचे धनी होते. सर्वांना सोबत घेऊन जाण्याच्या स्वभावामुळे विरोधक ही त्यांच्या प्रेमात पडत असत असं सांगून मुनगंटीवार म्हणाले की, देशात वस्तू आणि सेवा कर प्रणालीच्या अंमलबजावणीच्यानिमित्ताने वारंवार त्यांच्याशी संवाद साधण्याचा, त्यांच्यासमवेत बैठकांमध्ये सहभागी होण्याचा योग आला. त्यावेळी त्यांचे सर्वस्पर्शी व्यक्तिमत्त्व जे सर्वांना भारून टाकणारे होते ते पहायला मिळाले. त्यांच्या सर्वसमावेशक दृष्टीमुळे जीएसटीचे सर्व निर्णय पक्षीय भेद न राहता ना केवळ एकमताने तर ते एक दिलाने मंजूर झाले. सर्वांना सोबत घेऊन जाण्याच्या त्यांच्या कौशल्यामुळेच देशात या करप्रणालीची अंमलबजावणी यशस्वी ठरली असे ही मुनगंटीवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे. आधी ज्येष्ठ भगिनी आणि माजी मंत्री, राष्ट्रीय नेत्या सुषमा स्वराज यांचे आपल्यातून जाणे आणि आता अरूण जेटली यांच्या निधनाने राष्ट्र दोन अनमोल व्यक्तिमत्त्वाच्या नेतृत्वाला गमावून बसले आहे असेही मुनगंटीवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे.AM News Developed by Kalavati Technologies