उद्योग, प्रकल्पांच्या गरजा लक्षात घेऊन आखले जाणार 'कौशल्य विकास'चे अभ्यासक्रम

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मंत्रालयात कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाचे सादरीकरण करण्यात आले.

मुंबई | राज्यात येणारे खासगी, सार्वजनिक प्रकल्प, नवनवीन उद्योग यांना ज्या प्रकारचे कुशल मनुष्यबळ लागते त्याची माहिती घेऊन त्याप्रमाणे कौशल्य विकासविषयक अभ्यासक्रम तयार करण्यात यावेत, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौशल्य विकास विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मंत्रालयात कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाचे सादरीकरण करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी विभागाची आणि विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध अभ्यासक्रमांची माहिती घेतली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक, विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, कौशल्य विकास आयुक्त दिपेंद्रसिंह कुशवाह आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, कौशल्य विकासविषयक अभ्यासक्रमांचे जिल्हानिहाय नियोजन करणे गरजेचे आहे. त्या त्या भागातील गरजा, तेथील उद्योग, लघुउद्योग, उत्पादनसाधने आदींची माहिती घेऊन त्या अनुषंगाने अभ्यासक्रमांची आखणी होणे गरजेचे आहे. राज्यात अनेक खासगी, सार्वजनिक, शासकीय असे मोठ-मोठे प्रकल्प येत आहेत. या प्रकल्पांसाठी आवश्यक असलेल्या कुशल मनुष्यबळाची माहिती घेऊन तसे अभ्यासक्रम आखावेत, अशा सूचना त्यांनी केल्या.

अनेक ग्रामीण तरुणांना विविध अभ्यासक्रमांची माहिती नसते. ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यात यावी. तसेच उद्योग विभागाशी समन्वय ठेवून विविध उद्योगांना लागणाऱ्या कुशल कारागिरांची माहिती घेऊन ती संबंधित तरुणांपर्यंत पोहोचविण्यात यावी. तरुणांचा कौशल्य विकास करण्याबरोबरच त्यांना योग्य जागी नोकरी लागेल यासाठीही विभागाने नियोजन करावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

तरुणांना योग्य ठिकाणी नोकरीसाठी कार्यवाही- मंत्री नवाब मलिक
कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक म्हणाले, राज्यात कुशल रोजगार निर्माण करण्यात कौशल्य विकास विभागाचे मोठे योगदान आहे. आयटीआयच्या माध्यमातून आतापर्यंत लाखो तरुणांना रोजगार मिळाला आहे. दीर्घ मुदतीच्या अभ्यासक्रमात राज्यात इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर, मेकॅनिक, वायरमन, टर्नर असे विविध अभ्यासक्रम चालविले जातात. महिलांसाठीही ड्रेस मेकींग, फॅशन टेक्नॉलॉजी असे विविध अभ्यासक्रम आहेत. संगणकविषयकही अभ्यासक्रम आहेत. आता त्या त्या ठिकाणची उपलब्ध साधनसामुग्री, उद्योगांच्या बदलत्या गरजा, सेवा क्षेत्राची मागणी यानुसार नव्या अभ्यासक्रमांची आखणी केली जाईल. याशिवाय तयार असलेले कुशल कारागीर व उद्योगांना लागणारे कुशल कारागीर यांची सांगड घालून तरुणांना योग्य ठिकाणी नोकरी मिळण्यासाठीही विभागामार्फत कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.AM News Developed by Kalavati Technologies