ट्रॅक्टर चालकाच्या निष्काळजीपणाने घेतला वृद्ध महिला कामगाराचा बळी

नांदेड जिल्ह्यातल्या हदगाव तालुक्यातील तामसा येथील कापूस खरेदी केंद्रावरील घटना

नांदेड | हदगाव तालुक्यातील तामसा येथील कापूस खरेदी केंद्रावर रोजंदारीवर काम करणाऱ्या वृद्ध महिला कामगाराच्या अंगावरून ट्रॅक्टर गेल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना मंगळवारी (ता.२६) मध्यरात्री अकराच्या सुमारास घडली आहे. जिनिंगमध्ये कापसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाच्या निष्काळजीपणामुळे सदरील महिला कामगाराला जीव गमवावा लागला आहे. धोंडाबाई ब्रह्माजी खंडागळे (वय ६५) राहणार पांगरी (ता. हदगाव) असं मयत महिलेचं नाव आहे. सदरील महिला नटराज जिनिंग व प्रेसिंग तामसा येथे रोजंदारीवर कामाला होत्या. मंगळवारी मध्यरात्री धोंड्याबाई या कापूस उचलून टाकण्याच्या कामावर होत्या. ज्या ट्रॅक्टरमुळे त्यांचा मृत्यू झाला ते ट्रॅक्टर नादुरुस्त असल्यामुळे दिवसभर बंद होते. त्यामुळे धोंडाबाईनी कापसाच्या पायथ्याशी अंग टाकले आणि त्यांना झोपली लागली. रात्री दहाच्या सुमारास ट्रॅक्टर दुरुस्त झाल्यामुळे चालकाने कापूस ओढण्याच्या कामाला सुरुवात केली. पण धोंड्याबाई झोपलेल्या असल्याचे त्याचे लक्ष गेले नाही. निद्रिस्त अवस्थेत असलेल्या धोंड्याबाईच्या अंगावरून ट्रॅक्टर गेले अन त्यातच त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला.

मयत धोंडाबाई या विधवा असून एकट्याच पांगरी (रावणगाव) येथे रोजमजुरी करून उरलेले आयुष्य काढत होत्या. पण लॉकडाऊनमुळे हाताला काम नसल्यामुळे जगणे मुश्किल झाले होते. सीसीआयवर कापूस खरेदी चालू झाल्यामुळे जिनिंग चालू झाली व त्यांनी रोजंदारीवर जिनिंगवर पोटाची खळगी भरण्यासाठी काम करणे चालू केले. येथे नुकत्याच त्या कामासाठी आल्या होत्या. पण जेथे त्या पोट भरण्यासाठी गेल्या तेथेच त्यांच्या जीवनाचा ट्रॅक्टर चालकाच्या निष्काळजीपणामुळे करूण अंत झाला. या घटनेनंतर पांगरी व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान घटनास्थळी पोलीस कर्मचारी पाचारण करण्यात आले होते. याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव मद्दे म्हणाले, या दुर्दैवी प्रकाराबद्दल ट्रॅक्टर चालक व व्यवस्थापनातील इतर दोघा व्यक्तींना चौकशीसाठी बोलवण्यात आले असून मयत महिलेच्या विवाहित मुलीच्या तक्रारीनंतर रितसर गुन्हा नोंदविण्यात येणार आहे.AM News Developed by Kalavati Technologies