यवतमाळ | दिग्रस तालुक्यातील तिवरी बीट क्षेत्रात वन्य प्राण्यांची शिकार करतांना तीन जणांना अटक करण्यात आली आहे. वन विभागाने ही कार्यवाही करून सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले आहे. शनिवारी रात्री वन विभाग कर्मचारी व अधिकारी नेहमीप्रमाणे गस्त करीत होते. अंदाजे रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास त्यांना तिवरी बीट मधील राखीव क्षेत्र क्रमांक 739 जंगलामध्ये काही संशयास्पद हालचाली व उजेड दिसला. त्यानंतर वन विभाग कर्मचाऱ्यांनी सापळा रचून प्रत्यक्ष कार्यवाही केली असता तीन व्यक्तींना शिकार करतांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या तिघांचीही झाडझडती घेतली असता त्यांच्या कडून शिकार केलेले तीन ससे जप्त करण्यात आले. शंकर हरी राठोड रा. नायगाव, प्रदीप रोहिदास आडे नायगाव, मिलन आत्माराम राठोड शिरपूर, असं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
दिग्रस वन परिक्षेत्र अधिकारी आनंद धोत्रे क्षेत्र सहाय्यक एस व्ही जाधव ए टी इंगोले अमोल घनसावंत सुशील गुरनुले यांनी ही कारवाई केली. आरोपींवर वन अधिनियम अंतर्गतच्या कलम अंतर्गत आरोप दाखल करण्यात आले आहे. जप्त केलेले ससे पशु वैद्यकीय अधिकारी दिग्रस यांच्याकडे शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आले आहे. सहाय्यक वन संरक्षक अधिकारी विश्वनाथ करे यांच्या मार्गदर्शनात सर्व प्रक्रिया पूर्ण करून आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. गेल्या दोन महिन्यात शिकारीसाठी निघालेल्या व्यक्तींना अटक करण्याची ही दुसरी वेळ आहे.