नवरदेवाची अनोखी वरात, बैलगाडीतुन आला थेट लग्नमंडपात

हातात बैलांचा कासरा धरून बैलगाडीत निघाली नवरदेवाची वरात

सांगली | तासगाव तालुक्यातल्या लोढे गावात एक अनोखा विवाह सोहळा संपन्न झाला आहे. लग्न सोहळ्याच्या वरातीसाठी नवरदेवानं चक्क बैलगाडीतून प्रवास केला आहे. नवरदेव बैलगाडीतून मंगलकार्यालयात दाखल झाल्याने सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे. आपल्या लाडक्या सर्जा राजावर स्वार झालेल्या या नवरदेवाचा व्हिडीओ टिकटॉक वर चांगलाच व्हायरल होत आहे. लोढे गावच्या मनोज ठोंबरेंच नुकतंच पेडच्या अश्विनी शेंडगेशी लगीन ठरलं होत. मनोज सांगलीच्या पाटबंधारे विभागात लिपिक टंकलेखक म्हणून शासकीय नोकरीत कार्यरत आहे. मनोज हा शेतकऱ्याचा मुलगा असल्याने त्याचे बैलांवर प्रचंड प्रेम होते आपल्या लग्नाची वरात थेट बैलगाडीतुन काढण्याचा मनोजचा हट्ट होता. तासगाव भिवघाट रोडला चिचंणीच्या सागर मंगल कार्यालयात मनोजचा लग्नसमारंभ पार पडणार होता.

मंगलकार्यालय घरापासून पाच किलोमीटर अंतरावर असल्याने मी बैलगाडीतून वरात काढणार असं मनो़जने ठरवलं होतं. मनोजने आपल्या कुटुंबीयांना या बाबत माहिती सांगितली. मनोजचे बोल ऐकल्यावर सर्वांना आश्चर्य वाटलं. घरच्यांनीसुद्धा मनोजला या गोष्टीची परवांगी दिली. सजला धजलेला मनोज आपल्या बैलगाडीत बसला आणि वरात लग्नमंडपाकडे निघाली. हातात बैलांचा कासरा धरून बैलगाडीत बसलेल्या नवरदेवाला पाहून सगळ्यांनाच आर्श्चयाचा धक्का बसला. अर्धा पाऊण तासाच्या या प्रवासानंतर नवरदेव लग्नमंडपात आला आणि मुहूर्तावर विवाहबंधनात अडकला. लग्नसमारंभाच्या कार्यात यावेळी बैलगाडीची चर्चा रंगली होती. दरम्यान बैलगाडीवरून तुफानी वेगात स्वार झालेल्या या नवरोबाचा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.AM News Developed by Kalavati Technologies