सैनिकाने केली पत्नीची गोळी झाडून हत्या, त्यानंतर स्वत:लाही संपवले

कारण अजुन अस्पष्ट

वर्धा । पुलगाव येथील दारूगोळा भांडरात राहणाऱ्या सैनिकाने पत्नीची गोळी घालून हत्या केली. त्यानंतर स्वतःला सुद्धा गोळी मारून घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. अजय कुमार सिंग असे सैनिकांचे तर प्रियंका असे मृत पत्नीचे नाव आहे. या घटनेची पोलासांनी दिलेली माहिती अशी, की अजयसिंग हा मूळचा बिहार येथील आहे. बुधवारी रात्री तो ड्युटीवरून घरी आला. यानंतर त्याच्या घरातून गोळी चालण्याचा आवाज आल्याने कॅम्प परिसरात खळबळ उडाली. कॅम्पच्या आतील परिसरात राहणाऱ्यांनी घराकडे धाव घेतली. यावेळी दोघेही रक्तबंबाळ अवस्थेत पडून होते. दोघांना लागेचच कॅम्पच्या आतील असणाऱ्या सैनिकी रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी सैनिकांची पत्नी प्रियंका हिचा अगोदरच मृत्यू झाला होता. यात अजयकुमार याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला सावंगी रुग्णालयात नेण्यात आले. पहाटे त्या सैनिकाचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.

पुलगाव पोलीसांनी घटनेची चौकशी सुरू केली असून दोघांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले जाणार आहे. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करत पंचनामा केला. यात फॉरेन्सिक चमूकडून आणखी काही माहिती मिळते का याची चौकशी केली जाणार आहे. घरात रक्ताचा सडा आणि साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचे दिसून आले. यावेळी पोलीसांना ज्या बंदूकीने गोळीबार केला ती बंदूक सापडली आहे. घटनेमागचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही. चौकशी सुरू असून लवकरच प्रकरणाचा उलगडा केला जाईल, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी तृप्ती जाधव यांनी दिली, इंसास रायफलने गोळी झाडण्यात आली तेव्हा ती गरोदर असल्याची माहिती पुढे येत आहे. यावर पोलीसांनी अद्याप दुजोरा दिला नसून शवविच्छेदनाच्या अहवालानंतर ही बाब स्पष्ट होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. नेमके कारण काय हे कुटुंबीय आल्यावर मिळते का? या प्रतीक्षेत पोलीस आहे. कुटुंबीयांना घटनेची महिती देण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.



AM News Developed by Kalavati Technologies