मालेगाव, धारावीसारखे सहकार्य औरंगाबादेतील जनताही करेल, शरद पवारांनी व्यक्त केला विश्वास

मालेगाव, धारावीच्या जनतेसारखे सहकार्य औरंगाबादेतील जनताही करेल, आणि कोरोना संकटावर मात करेल, शरद पवारांनी व्यक्त केला विश्वास

औरंगाबाद | जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकार्‍यांच्या उपस्थितीत आढावा घेतला. महाराष्ट्रात कोरोनाची मुंबईपेक्षाही चिंताजानक स्थिती ही डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई या ठिकाणी आहे, तसेच औरंगाबादमध्येही कोरोनाची स्थिती चिंताजनक असून आवश्यक ते उपाय योजले गेले पाहिजेत असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे

पत्रकार परिषदेत बोलतांना शरद पवारांनी औरंगाबादकरांना मालेगांव धारावीचे उदाहरण दिले आहे. मालेगाव धारावीमधील लोकांनी प्रशासनाला जे सहकार्य केले तसेच सहकार्य औरंगाबाद शहरातील जनताही करेल आणि संकटावर मात करेल, अशी खात्री वाटते असं म्हंटल आहे. त्याचबरोबर केंद्राने दिलेली मदत अजून राज्यात आलेली दिसत नाही. त्यामुळे आता उद्योगधंदा कसा सुरू होईल याकडे लक्ष द्यायला हवे. जसा आरोग्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे तसाच राज्याचा आर्थिक प्रश्नही महत्त्वाचा असल्याचं त्यांनी म्हंटल आहे.

"राज्याची आर्थिक बाजू बळकट करण्यासाठी औद्योगिक क्षेत्र सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या संकटावर मात करण्यासाठी डॉक्टर, जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन, लोकप्रतिनिधी इतकेच नाही तर खुद्द मुख्यमंत्र्यांनीही यात जबाबदारीने लक्ष घातलं आहे. मात्र लोकांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. ज्या सूचना सरकार करत आहे, त्याचे काटेकोर पालन जनतेकडून होताना दिसत आहे". खासगी डॉक्टर रुग्णसेवा देण्यासाठी पुढे येत नाहीत. त्यासाठी जिल्ह्याच्या यंत्रणेला डिझॅस्टर मॅनेजमेंट कायदा आहे त्यातील अधिकारांचा वापर करून खासगी डॉक्टरांना समन्स पाठवण्याचा विचार करावा लागेल. असं शरद पवारांनी पत्रकार परिषदेत बोलतांना म्हंटल आहे.AM News Developed by Kalavati Technologies