#Budget2020 | सरकारी बँकांमधील भरतीसाठी घेतली जाणार एकच ऑनलाइन परिक्षा

पदांवरील भरतीसाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये परीक्षा केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत

नवी दिल्ली | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. यामध्ये सरकारी बँकांमधील भरतीसाठी महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. सरकारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील सरळसेवा भरती प्रक्रिया आणखी सुलभ केली जाणार आहे.

सरकारी बँकांमधील भरतीविषयी त्यांनी सांगितले की, परीक्षार्थींना अनेक टप्प्यांत परीक्षा द्यावी लागत असते. मात्र आता यामध्ये बदल केला जाणार आहे. त्याऐवजी एकच ऑनलाइन परीक्षा द्यावी लागणार आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये परीक्षा केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत. त्यासाठी एक एजन्सी स्थापन केली जाणार आहे.

सरकारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये नॉन-गॅझेटेड पोस्ट भरतीसाठीचे धोरण बदलण्यात येणार आहे. सद्यस्थितीत अनेक टप्प्यांत परीक्षा घेतल्या जातात. आता नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सी (एनआरए) स्थापन करण्याचे प्रस्तावित आहे. सरळसेवा भरतीसाठी ऑनलाइन समान पात्रता परीक्षा घेतली जाणार असल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. या पदांवरील भरतीसाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये परीक्षा केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. देशातील 112 जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.



AM News Developed by Kalavati Technologies