गावातील प्रत्येकाच्या अंतयात्रेत सहभागी होते ही गाय, अंतिमसंस्कार झाल्याशिवाय चारापाणीही घेत नाही

ही गाय या परिसरात कुतुहलाचा विषय बनली आहे

जळगाव | हिंदु संस्कृतीत गाईला आईचा दर्जा दिला जातो. गाईच्या ह्रदयात ३३ कोटी देवतांचे वास्तव्य असल्याचे मानले जाते. त्यामुळे गाय सर्वांना पूजनीय असते. पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव येथील गाय मात्र इतर गाईंपेक्षा वेगळी आहे. ही गाय गावात कुणाचा मृत्यू झाल्यास चारापाणी खात नाही. एव्हढेच नाही तर अंत्यविधी कार्यक्रमाला हजर असते.

पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव या गावाला आधीपासूनच धार्मिकतेचा वारसा आहे. या गावात अंबिका देवीचे पुरातन भव्य मंदिर असून या देवीच्या नावानेच गावाची ओळख असल्याने अंबे वडगाव या नावाने ओळखले जाते. गावात देवीच्या भक्तांची मनोकामना पूर्ण झाल्यास नवस फेडण्यासाठी पाळीव गाय किंवा वासरू अंबिका देवीच्या नावाने सोडून देवीचा आशिर्वाद घेण्याची प्रथा आहे. असेच एक गायीचे वासरु एका भाविकाने देवीच्या नवसाला सोडले होते. परंतु हे वासरु सोडल्यापासून गावात एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर ही गाय त्या व्यक्तीच्या घराजवळ जाऊन बसते. तसेच व्यक्तीच्या अंतयात्रेत सामील होऊन स्मशानभूमीत देखील हजरी लावते. ही गाय एवढ्यावरच थांबत नाही. तिसऱ्या दिवशी सारी सरकटण्याच्या दिवशीही हजर असते. यामुळे ही गाय या परिसरात कुतुहलाचा विषय बनली आहे.



AM News Developed by Kalavati Technologies