'तिळगुळ घ्या गोड गोड बोला', 'हे' आहेत तिळगुळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे

तिळगुळ खाण्याचे काही आरोग्यदायी फायदेदेखील आहेत. काय आहेत तिळगुळ खाण्याचे फायदे तेच आपण जाणून घेणार आहोत.

स्पेशल डेस्क ।  मकर संक्रांत या सणाला अवघ्या काही तासांचा अवधी उरला आहे. मकर संक्रांत हा सण संपूर्ण भारतात वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो. या वर्षी मकर संक्रांत 15 जानेवारीला आहे. मकर संक्रांत म्हटले की तिळगुळ आलेच. तिळगुळ घ्या अन गोड गोड बोला असं म्हणण्याची परंपरादेखील आपल्याकडे आहे. तिळगुळ खाण्याचे काही आरोग्यदायी फायदेदेखील आहेत. काय आहेत तिळगुळ खाण्याचे फायदे तेच आपण जाणून घेणार आहोत.

- तिळात कॅल्शियम आहे, याशिवाय मँगनीज, लोह, फॉस्फरस, सेलेनियम, ब गटातील जीवनसत्त्वे आणि तंतुमय पदार्थही आहेत. तीळातील कॅल्शियम हाडांसाठी चांगलं तर आहेच, तसेच तिळात झिंक जास्त असते, जे हाडांचा ठिसूळपणा रोखण्यास मदत करते.

- तीळातील तंतुमय पदार्थामुळे कोठा साफ राहील. याचा फायदा मधुमेहींसाठी आणि कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी होऊ शकतो. 

- अर्धा चमचा तीळ खाऊन त्यावर कोमट पाणी प्यायल्यास थंडीचा त्रास कमी होऊन शरीरातील उष्णता टिकून राहण्यास मदत होते.

- बाळंतशेपा, ओवा, भाजलेले तीळ, सैंधव, बडीशेप एकत्र करून बाळंतिणीला दिल्यास वाताच्या तक्रारी, गॅसेस होणे, पचन न होणे या सर्वांस आराम मिळतो.

- त्वचा मुलायम राहण्यासाठीही तीळ उपयुक्त असतात. तीळात तेल असल्याने त्वचेची कांती सुधारते. त्यामुळे त्वचा कोरडी पडू नये यासाठी थंडीच्या सुरुवातीपासूनच तीळ खाल्ल्यास त्वचा कोरडी पडण्याचे प्रमाण कमी होते.

- तीळ पचायला जड असल्याने थंडीमध्ये भूक शमवण्यासाठी भाकरीला तीळ लावून खाण्याची पद्धत आहे. थंडीच्या दिवसात लसूण, खोबरे घालून केलेली तिळाची चटणी खाणे चांगले. ज्या महिलांना पाळीत कमी रक्तस्त्राव होतो त्यांनी ही चटणी खाल्ल्यास फायदा होतो.

- लहान मुलांना काहीवेळा अपचन होऊन पोट दुखते. अशा वेळी बेंबीच्या भोवती गोलाकार तिळतेल चोळावे आणि गरम तव्यावर कापड गरम करून शेकावे. दुखणे लवकर कमी होते.AM News Developed by Kalavati Technologies