स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उस्मानाबाद येथे राडा

खरीप पिकविम्यातून वगळल्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी केली तोडफोड

उस्मानाबाद । जिल्ह्याला सोयाबीन वगळता केवळ उडीद व मुगाचा पिक विमा सद्यस्थितीत मिळाला आहे. या विम्याची रक्कम अत्यंत तुटपुंज्या स्वरूपात शेतकऱ्यांकडे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येत आहे. ही रक्कम अत्यंत तोकडी असल्यामुळे तसेच सोयाबीनचा पिक विमा अद्याप दिला नसल्यामुळे यासंदर्भात विचारणा करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयात आले होते.

मात्र तेथे जिल्हा कृषी अधिकारी उपस्थित नसल्यामुळे कृषी उपसंचालकांच्या कार्यालयात ते गेले. तेथे त्यांनी उपसंचालक एस पी जाधव यांच्याशी चर्चा सुरू केली. या संदर्भात कृषी विभागाने पिक विमा कंपनीकडे कसा अहवाल सादर केला आहे. तसेच कोणती कागदपत्रे दाखल केली आहेत. याबाबत माहिती विचारली. परंतु उपसंचालक जाधव यांनी समाधानकारक माहिती न दिल्यामुळे कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला. त्यांनी शेतकऱ्यांना सोयाबीनचा पिक विमा मिळालाच पाहिजे अशी जोरदार घोषणाबाजी करत कार्यालयात असलेल्या सर्व खुर्च्या फोडून टाकल्या. यामुळे कार्यालयाच्या परिसरात मोठा गोंधळ उडाला. सर्व कर्मचारी धावत उपसंचालकांच्या कक्षाकडे आले. दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे व अन्य कार्यकर्त्यांनी सोयाबीनचा पिक विमा तातडीने मिळावा अन्यथा यापेक्षा उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.AM News Developed by Kalavati Technologies