सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण; रिया चक्रवर्तीला ईडीकडून समन्स, उद्या होणार चौकशी

सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला अंमलबजावणी संचलनालयाने (ED) समन्स बजावून 7 ऑगस्ट रोजी चौकशीकरता बोलावले आहे.

मुंबई | सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूच्या घटनेला जवळपास 2 महिने पूर्ण होत आले आहेत. याप्रकरणाचा तपास सध्या वेगळ्या वळणावर येऊन पोहोचला आहे. याप्रकरणी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला अंमलबजावणी संचलनालयाने (ED) समन्स बजावून 7 ऑगस्ट रोजी चौकशीकरता बोलावले आहे. ईडीच्या मुंबई कार्यालयामध्ये ही चौकशी होणार आहे. दरम्यान आज रियाचा सीए रितेश शाहची देखील ईडीकडून चौकशी केली जाणार आहे. दरम्यान याआधीही रितेशला समन्स बजावण्यात आले होते, मात्र तो चौकशीला सामोरे गेला नव्हता. याआधी रियाचा जवळचा मित्र ज्याचे बिहार पोलिसांच्या एफआयआरमध्ये नाव आहे, त्या सॅम्युअल मिरांडाची देखील ईडीने चौकशी केली होती.

तर सुशांत सिंह राजपूतचा सीए संदीप श्रीधरची देखील ईडीने चौकशी केली आहे. श्रीधरच्या चौकशीनंतर रियाला देखील समन्स बजावण्यात आले आहेत. सुशांतचे आर्थिक व्यवहार आणि त्याने संस्थापित केलेल्या कंपन्यांसंदर्भात श्रीधरची चौकशी करण्यात आली होती.

28 जुलै रोजी सुशांत सिंह राजपूतचे वडील केके सिंह यांनी रिया आणि तिच्या कुटुंबीयांविरोधात पाटणा पोलिसांत स्वतंत्र एफआयआर दाखल केली आहे. यामध्ये त्यांनी सुशांतला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आणि फसवणुकीचा आरोप केला आहे. कमी कालावधीमध्ये रियाने सुशांतच्या खात्यातून 15 कोटी काढल्याचा आरोप देखील त्यांनी यामध्ये केला होता.

या कथित आत्महत्या प्रकरणात आता केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात CBI च्या चौकशीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. याबाबत नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहेत. सीबीआयच्या सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, केंद्र सरकारकडून सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सांगितलं की, बिहार सरकारने या प्रकरणाची CBI चौकशीची शिफारस केली होती. केंद्राने बिहार सरकारची शिफारस मान्य केली आहे. आता या प्रकरणाची चौकशी CBI करणार आहे.AM News Developed by Kalavati Technologies