मध्यस्थता समिती अपयशी, अयोध्याप्रकरणी 6 ऑगस्टपासून नियमित सुनावणी

अयोध्या प्रकरणावर मध्यस्थता समितीच्या अहवालात तोडगा न निघाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

नवी दिल्ली । अयोध्या राम जन्मभूमी प्रकरणावर आता नियमित सुनावणी होणार असल्याचे सुप्रीम कोर्टाने निश्चित केले आहे. 6 ऑगस्टपासून ही सुनावणी घेण्यात येणार आहे. आठवड्यातून तीन दिवस निकाल लागेपर्यंत ही सुनावणी होणार असल्याचे सुप्रीम कोर्टाकडून सांगण्यात आले. अयोध्या प्रकरणावर मध्यस्थता समितीच्या अहवालात तोडगा न निघाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

अयोध्येतील वादग्रस्त जमीन प्रकरणाची सुनावणी आज सुप्रीम कोर्टात करण्यात आली. अयोध्या प्रकरणाच्या नियमित सुनावणीवर आज निर्णयदेखील घेण्यात आला. अयोध्या वादग्रस्त जमीन प्रकरणात चर्चेतून तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने मध्यस्थता समिती स्थापन केली होती. या मध्यस्थता समितीला 31 जुलैपर्यंत अंतिम अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार मध्यस्थता समितीने 18 जुलै रोजी आपला अहवाल न्यायालयात सादर केला आहे. त्यानंतर पाच न्यायमूर्तींचा समावेश असलेल्या सर्वोच्च न्यायालयाने 2 ऑगस्टची तारीख निश्चित केली होती. या खंडपीठात सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यासह न्यायमूर्ती एस. एस. बोबडे, न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती एस. ए. नजीर यांचा समावेश आहे. अयोध्या प्रकरणाची रोज सुनावणी घ्यायची की नाही, यावर आज सुप्रीम कोर्ट निर्णय दिला आहे. तसेच 17 नोव्हेंबर 2019 पर्यंत या खटल्याचा निकाल लागण्याची मुदतही न्यायालयाने ठरवली आहे.AM News Developed by Kalavati Technologies