शिवसेनेचे नगरसेवक सुनील सुर्वे यांचा कोरोनामुळे मृत्यू..

सुनील सुर्वे हे शिवसेनेचे जेष्ठ नगरसेवक असून 1995 पासून ते नगरसेवक म्हणून निवडून येत होते

मुंबई । उल्हासनगर महापालिकेतील शिवसेना नगरसेवकाचे कोरोनामुळे निधन झाले आहे. सुनील सुर्वे असे निधन झालेल्या नगरसेवकाचे नाव आहे. सुनिल सुर्वे यांना मागील महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी उपचारार्थ ठाण्याच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 23 दिवस उपचार घेतल्यानंतर कोरोनावर मात करून ते घरी आले होते. दरम्यान 15 दिवसांपूर्वी त्यांना पुन्हा श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता. म्हणून त्यांना घरीच उपचार करून ऑक्सिजन लावण्यात आले.

दोन दिवसांपूर्वी त्रास वाढल्यानंतर सुर्वे यांना उल्हासनगरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र रविवारी सायंकाळी 5 च्या सुमारास त्यांचे निधन झाले. सुनील सुर्वे हे शिवसेनेचे जेष्ठ नगरसेवक असून 1995 पासून ते नगरसेवक म्हणून निवडून येत होते. अभ्यासू असलेले सुर्वे हे महापालिका सभागृह दणाणून सोडत होते.

सुनिल सुर्वे यांच्या जाण्याने संघटनेत एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे, असे शिवसेना जेष्ठ नगरसेवक आणि शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी सांगितले. सुर्वे यांची बायपास झाली होती. शिवाय डायलिसिस देखील करावे लागत होते. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या विविध भागात कोरोनाचा कहर वाढत आहे. अनेक राजकीय नेत्यांनाही कोरोनाची लागण झाली. या आधी ठाणे जिल्ह्यातील एका शिवसेना नगरसेवकाचं कोरोनामुळे निधन झाले होते.AM News Developed by Kalavati Technologies