सततच्या नापिकीला कंटाळून भोकरदनमध्ये तरूण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

भोकरदन तालुक्यातील देहेड गावातील एका तरुण शेतकऱ्याने, सततच्या नापिकीला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे

औरंगाबाद । भोकरदन तालुक्यातील देहेड येथे सततच्या नापिकीमुळे तरुण शेतकऱ्याने आपल्या शेतामधील बाभळीच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या करून आपली जीवन यात्रा संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गणेश गंजीधर बावस्कर (वय २७) असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. हि घटना रविवारी सकाळी ६:३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. मॉर्निंग वॉकिंगला जाणाऱ्या मुलांना बाभळीच्या झाडावर मृतदेह लटकताना निदर्शनास आले. त्यानंतर मुलांनी ही माहिती गावकऱ्यांना व त्यांच्या नातेवाईकांना सांगितली.

गावकऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ ही माहिती पोलिसांना कळविली. त्यानंतर पोलिसांना घटनास्थळी धाव होऊन घटनेचा पंचनामा करून मृत्यूदेह खाली काढण्यात आला. भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोना तसेच शेतकऱ्यांवर आस्मानी संकट ओढवल्याने आर्थिक अडचण निर्माण झाली असून, शेतामध्ये पेरणी केलेल्या पिकांचा खर्च देखील निघणार नसल्याने तसेच सतत होत असलेल्या नापिकीमुळे गणेश बावस्कर यांनी आत्महत्या केल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले आहे.

गणेश बावस्कर यांच्यावर देहेड येथील स्मशाभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, दोन बहिणी असा परिवार आहे. या घटनेमुळे देहेड परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेचा अधिक तपास भोकरदन पोलिस ठाण्याच्या वतीने करण्यात येत आहे.



AM News Developed by Kalavati Technologies