राज्यव्यापी दुधआंदोलन; परभणी व गंगाखेडमध्ये भाजपचा रास्ता रोको, महाविकासआघाडी विरोधात जोरदार घोषणाबाजी

दूध उत्पादक शेतकऱ्याला सरसकट 10 रूपये प्रती लिटर व दूध पावडरला प्रती किलो 50 रूपये अनुदान देण्याची केली मागणी

परभणी | जिल्ह्यात भाजप, रिपाई आठवले गट, रासप, रयतक्रांती व शिवसंग्राम महायुतीच्या वतीने सरकारविरोधात पुकारलेल्या दुध आंदोलनात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. गंगाखेडमध्ये रासप आमदार रत्नाकर गुट्टे तर परभणी महानगराध्यक्ष आनंद भरोसे यांच्या नेतृत्वाखाली दूध उत्पादक शेतकऱ्याला सरसकट 10 रूपये प्रती लिटर व दूध पावडरला प्रती किलो 50 रूपये अनुदान मिळावे या मागणीसाठी आज आंदोलन करण्यात आले.

कोरोना सारख्या जागतिक माहामारीच्या संकटात शेतकरी बांधवानी जीव धोक्यात घालून जीवनावश्यक वस्तूत समावेश केलेल्या दूध उत्पादनाचे काम केले. मात्र सध्या दूधाचे भाव आतिशय कमी झाले आहेत. राज्य शासनाने दूध उत्पादकाना मिळणारे अनुदान बंद केल्यानं शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो आहे. त्यामुळे दुध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर 10 रुपये अनुदान मिळावे यासाठी राज्यभरात आंदोलन केल्या जात आहे.

या पार्श्वभुमीवर परभणी शहरातील उड्डाणपुलावर महानगराध्यक्ष आनंद भरोसे तर गंगाखेड मध्ये आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपा रासप शिवसंग्राम रिपाई आठवले गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या आंदोलनामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.AM News Developed by Kalavati Technologies