एसटी कर्मचार्‍यांचे शुक्रवारी राज्यव्यापी आंदोलन

कर्मचार्‍यांसमोर दिवाळी सण साजरा कसा करायचा असा प्रश्‍न निर्माण झाला आहे

मुंबई । राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे तीन टक्के महागाई भत्ता तातडीने लागू करावा आणि दिवाळीपूर्वी सर्व कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेने केली आहे. मागण्या मान्य न झाल्यामुळे 25 ऑक्टोबरला राज्यातील सर्व विभागीय कार्यालये आणि मध्यवर्ती कार्यशाळांपुढे निदर्शने करण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे. दिवाळीतील मिळणारा सानुग्रह अनुदान व विविध समस्यांबाबत राज्य परिवहन मंडळातील कर्मचार्‍यांनी शुक्रवार 25 ऑक्टोबर रोजी राज्यातील सर्व विभागीय कार्यालयासमोर राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याचे सोलापूर विभागातील कर्मचारी संघटनेचे सचिव प्रशांत गायकवाड यांनी एका वृत्तफत्राला बोलताना सांगितले.

दिवाळी सण तोंडावर असताना एसटी महामंडळ प्रशासन लाखो कर्मचार्‍यांचे आर्थिक नुकसान करत आहे. कर्मचार्‍यांसमोर दिवाळी सण साजरा कसे करायचे असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. याबाबत वेळोवेळी आंदोलने, निवेदन देऊनही एसटी प्रशासन जागे होत नाही. यासाठी एसटी महामंडळातील कर्मचार्‍यांनी 25 ऑक्टोबर रोजी राज्यातील सर्व विभागीय कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचे सांगितले.  दरम्यान, राज्य सरकारच्या तरतुदीनुसार एसटी कर्मचाऱ्यांना जुलै 2019 च्या वेतनापासून वाढीव तीन टक्के महागाई भत्ता लागू करण्याचे निश्चित केले होते. परंतु, अद्यापही वाढीव भत्ता लागू करण्यात आलेला नाही. हा वाढीव महागाई भत्ता थकबाकीसह दिवाळीपूर्वी कामगारांना देण्यात यावा, अशी विनंती संघटनेने यापूर्वी महामंडळाला पत्रव्यवहार करून केली आहे. दर वषी दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदानाचे वाटप केले जाते; परंतु या वर्षी दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली असतानाही त्याबाबत निर्णय झालेला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. तसेच, सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटीच्या कर्मचाऱ्यांना सणासाठी उचल देण्याचे कामगार करारान्वये मान्य करण्यात आले आहे. त्यानुसार एसटी महामंडळाने तृतीय आणि चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी साडेबारा हजार रुपये उचल द्यावी आणि ऑक्टोबर महिन्याचे वेतनही 25 ऑक्टोबरपर्यंत द्यावे, अशा विविध मागण्या संघटनेने महामंडळाकडे केल्या आहेत. सर्व मागण्यांवर दिवाळीपूर्वी निर्णय घेतल्यास कर्मचाऱ्यांमधील नाराजी दूर होईल, असे संघटनेचे सरचिटणीस हनुमंत ताटे यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले होते.AM News Developed by Kalavati Technologies