नांदेड । मोबाईलवर पब्जी गेम खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने तरूणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नांदेडच्या माहूर तालुक्यात घडली आहे. राजेश नंदू राठोड (वय 18) असे मृत तरूणाचे नाव आहे. तो शनिवारी 11.30 च्या सुमारास आपल्या घराशेजारी पब्जी हा गेम खेळत बसला होता. त्यावेळी वडील आणि घरातील इतर मंडळी नागपंचमीच्या सणाच्या तयारीत असल्याने राजेश कडे कुणाचेच लक्ष नव्हते.
गेम खेळतांना त्याला हृदयविकाराचा झटका आल्याने राजेशची मृत्यू झाला. परंतु, बराच वेळ ही बाब कोणाच्या लक्षात आली नाही. राजेश हालचाल करीत नसल्याने त्यांच्या वडिलांनी पाहिले असता त्यांनी आरडाओरड सुरू केली. तात्काळ त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, त्याला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या घटनेनंतर मच्छिंद्र पार्डी या गावावर शोककळा पसरली आहे.