कावळ्यांना इतर पक्षांच्या पिंजऱ्यातून पळवणारे तुम्हीच होते, उद्धव ठाकरेंचा शरद पवारांना टोला

पवारांनी 2014 मध्ये जे केले त्याचेच परिणाम त्यांचा पक्ष भोगीत आहेत - उद्धव ठाकरे

मुंबई | विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर नेत्यांची पळवापळवी सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेग दिग्गज नेते पक्षाला रामराम ठोकस सत्ताधारी पक्षात प्रवेश करत आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे भगदाड पडले आहे. आता शिवसेनेचे मुखपक्ष सामनामधून याविषयावर भाष्य करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर निशाणा साधला आहे. जे सोडून गेले ते कावळे व आता उरलेल्या मावळय़ांच्या जोरावर पक्षबांधणी करू असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला, पण जे कावळे उडाले त्या कावळय़ांना इतर पक्षांच्या पिंजऱ्यातून पळवणारे कोण होते? पवारसाहेब तुम्हीच होता. राष्ट्रवादीत पंधरा वर्षे राहून सत्तेचे दाणे, वैरण खाऊन या कावळय़ांचे मावळे होऊ शकले नाहीत. कावळेच ते, शेवटी कावळेच राहिले. महाराष्ट्रात ‘युती’ला जिथे गरज आहे तिथे नव्या मावळय़ांचे स्वागत होईल. उडून जाणारे कावळे आम्हाला नकोत. ‘युती’चा फॉर्म्युला ठरला आहे. महाराष्ट्राचा विकास आणि जनतेचे कल्याण या एकमेव अजेंडय़ावर सत्ता आणि जागांचे वाटप समान तत्त्वावर होईलच होईल. राज्य मावळय़ांचेच असेल. अशी कडवी टीका उद्धव ठाकरेंनी शरद पवारांनी केली आहे.

सामना संपादकीयमध्ये नेमके काय?
- शरद पवार हे अचानक शिवसैनिकांची भाषा बोलू लागले आहेत ही गमतीची गोष्ट आहे. राज्याचे मुख्यमंत्री असताना शिवसेनेची गुंडगिरी मोडून काढण्याची भाषा ते करीत. गुंडगिरीची भाषा खपवून घेतली जाणार नाही असे ते बोलत, पण शिवसैनिकांनी संकटकाळी जी भाषा वापरली तीच भाषा वापरून पोखरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला ऊर्जा देण्याचे काम पवार करीत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आभाळ फाटल्याप्रमाणे गळती लागली आहे. भगदाड, खिंडार हे शब्द तोकडे पडतील असा ‘लोट’ बाहेर पडत आहे. शरद पवार यांनी यावर भाष्य केले आहे. त्यांनी कार्यकर्त्यांसमोर सांगितले, ‘चिंता करू नका. उडाले ते कावळे!’ पवार यांच्याविषयी महाराष्ट्राला आदर आहे, पण राजकारणातली त्यांच्याविषयी असलेली भीती संपली आहे. काँग्रेस पक्षातून बरेच लोक भाजपात येत आहेत.
- हा ‘गळीत’ हंगाम फक्त महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात सुरू आहे. बहुजन समाज पार्टी, समाजवादी पार्टी, तृणमूल काँग्रेस, तेलुगू देसम अशा पक्षांतील लोक भाजपात उडय़ा मारीत आहेत. महाराष्ट्रातही या ‘गळीत’ हंगामाने जोर धरला असून काँगेस-राष्ट्रवादीतले दिग्गज लोक भाजप किंवा शिवसेनेत एका पायावर येण्यास तयार आहेत. नारायण राणे आधी शिवसेनेत होते. ते काँग्रेसमध्ये गेले. तेथून ते भाजपात गेले. राणे यांच्या आत्मचरित्र प्रकाशन सोहळ्यातही श्री. पवार यांनी सध्या पक्षांच्या चिठ्ठय़ा टाकून लोक पक्षबदलाबाबत कसे निर्णय घेतात यावर भाष्य केले. राधाकृष्ण पाटील यांनीही बहुधा शिवसेना-भाजप अशा दोन चिठ्ठय़ा टाकल्या असाव्यात.

- ‘शोले’ चित्रपटात जय-वीरूच्या नाणेफेकीत नाण्याच्या दोन्ही बाजूला‘छापा’च असल्याने अमिताभ बच्चन यांच्या बाजूनेच नाणेकौल पडत असे. तसे सध्या पक्षांतराच्या चिठ्ठय़ांबाबत होत आहे काय यावरही पवारांसारख्या जाणकारांनी मतप्रदर्शन करायला हवे. गेल्या तीन महिन्यांत, विशेषतः लोकसभेच्या ‘बंपर’ निकालानंतर महाराष्ट्रातील काँगेस पक्षाचा खुराडा रिकामा झाला, तर राष्ट्रवादीच्या गोठय़ातूनही अनेक दुभती जनावरे ‘दावणी’ तोडून बाहेर पडत आहेत. हे असे का घडत आहे? जे सोडून गेले ते कावळे व आता उरलेल्या मावळय़ांच्या जोरावर पक्षबांधणी करू असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला, पण जे कावळे उडाले त्या कावळय़ांना इतर पक्षांच्या पिंजऱ्यातून पळवणारे कोण होते? पवारसाहेब तुम्हीच होता.
- राष्ट्रवादीत पंधरा वर्षे राहून सत्तेचे दाणे, चारा, वैरण खाऊन या कावळय़ांचे मावळे होऊ शकले नाहीत. कावळेच ते, शेवटी कावळेच राहिले. असे अनेक कावळे शिवसेनेतून उडून गेले. तेव्हा ‘उडाले ते कावळे, राहिले ते मावळे’ या मंत्रावर शिवसेना उभी राहिली. कारण शिवसेनेत बाळासाहेबांनी घडवलेले मावळे हे जमिनीवरच राहिले. त्यामुळे 2014 च्या ‘मोदी’ लाटेतही याच मावळय़ांनी किल्ला लढवला व भगवा राखला. हा बाणा आजही शिवसैनिकांनी जपला आहे. तशी परिस्थिती काँगेस किंवा राष्ट्रवादीची आहे काय? मुळात या दोन्ही पक्षांना काही विचार, धोरण आणि दिशा उरली आहे काय? 370 कलम हटवले म्हणून साऱ्या देशात आनंदी आनंद असताना ‘370’च्या बाजूने काँग्रेस-राष्ट्रवादीने उभे राहणे हे कसले धोरण? त्यामुळे काँग्रेस पक्षालाही गळतीच लागली.
- 2014 मध्ये विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होण्याआधीच बिनशर्त पाठिंबा देत भाजपला सरकार बनविण्याचे आमंत्रण देणारे कावळे राष्ट्रवादीचेच होते. हा चोंबडेपणा करण्याची तशी गरज नव्हती. राष्ट्रवादीच्या कावळय़ांनी तेव्हा ही फालतू ‘काव काव’ केली नसती तर पुढच्या पाच वर्षांत महाराष्ट्राचे राजकारण नव्या वळणावर वाहताना दिसले असते, पण पवारांनी 2014 मध्ये जे केले त्याचेच परिणाम त्यांचा पक्ष भोगीत आहे. आपल्या अस्सल इरसाल कोकणी भाषेत बोलायचे तर ‘केले तुका आणि झाले माका!’ अशीच आज राष्ट्रवादीची स्थिती आहे. शिवसेना किंवा भाजपात कावळे येत आहेत की मावळे याचा निर्णय आम्ही घेऊच. ‘चंद्रकांत पाटील यांनी मध्यंतरी एक कटुसत्य सांगितले होते.
- सत्ता आहे म्हणून ‘आयाराम’ म्हणजे ‘इनकमिंग’ वाढले आहे. या ‘आयारामां’त कावळे किती आणि मावळे किती याचाही शोध आम्ही घेतच असतो. वाल्यांचे वाल्मीकी करणारे वॉशिंग मशीन तसे कुणाकडेच नाही. कधी कधी राजकारणात मजबुरी म्हणूनही ‘पदरी पडले पवित्र झाले’ या धोरणाने वागावे लागते. मग ते कावळे काय आणि राजहंस काय, चालवून घ्यावेच लागतात. महाराष्ट्रात ‘युती’ला जिथे गरज आहे तिथे नव्या मावळय़ांचे स्वागत होईल. उडून जाणारे कावळे आम्हाला नकोत. ‘युती’चा फॉर्म्युला ठरला आहे. महाराष्ट्राचा विकास आणि जनतेचे कल्याण या एकमेव अजेंडय़ावर सत्ता आणि जागांचे वाटप समान तत्त्वावर होईलच होईल. राज्य मावळय़ांचेच असेल.AM News Developed by Kalavati Technologies