अजित पवारांनी नक्राश्रू ढाळले, शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी कधी गेलात का? - उद्धव ठाकरे

शिवसेना-भाजपा महायुतीचे कळमनुरी मतदारसंघातील उमेदवाराच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंची भव्य सभा झाली.

हिंगोली | विधानसभा निवडणुकांचा आखाडा चांगलाच रंगला आहे. राज्यभरात विविध पक्षांच्या नेत्यांच्या सभांचा धडाक सुरू आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांवर निशाणा साधला आहे. काही दिवसांपूर्वीच पत्रकार परिषदेत त्यांना अश्रू अनावर झाले होते. यावरच बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, अजित पवारांनी सर्वांसमोर नक्राश्रू ढाळले मात्र कधी शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी गेलात का? असा सवाल त्यांनी यावेळी विचारला.

शिवसेना-भाजपा महायुतीचे कळमनुरी मतदारसंघातील उमेदवाराच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंची भव्य सभा झाली. या सभेमध्ये उद्धव ठाकरेंनी विरोधकांवार चांगलेच तोंडसुख घेतले. अजित पवारांसोबत त्यांनी राहुल गांधींवरही तुफान फटकेबाजी केली. महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक असतांना राहुल गांधी बँकाँकला गेल्याची बातमी आली. अशा लोकांच्या हाती महाराष्ट्राचे भवितव्य, भविष्य देणार का? असा संतप्त सवाल उध्दव ठाकरे यांनी उपस्थित केला. तर राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी आम्हालाही भावना आहेत असे म्हणत नर्काश्रु ढाळले. शेतकऱ्यांचे दु:ख, अश्रू पुसण्यासाठी कधी गेलात काय? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.

पुढे बोलताना ठाकरे म्हणाले की, काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारने शेतकऱ्यांना कर्ज वसुलीसाठी जप्तीच्या नोटीसा पाठवल्या. तेव्हा अजित पवार सत्ता उबवत होते, असा टोलाही त्यांनी लगावला. युतीच्या उमेदवाराला विधानसभेत पाठवा आखाडा बाळापुरला तालुका करणारच, आखाडा बाळापुरला तालुक्याचा दर्जा देण्याची मागणी पुढे आली आहे. त्यासाठी शिवसेना-भाजपा महायुतीचा हक्काचा आमदार  निवडूण द्या. रस्ते, सिंचन असे सर्व प्रश्न सोडवले जातील. यासोबतच आखाडा बाळापुरला तालुका करणारच हे माझे वचन आहे, असे उध्दव ठाकरे यांनी सांगितले.AM News Developed by Kalavati Technologies