#AyodhyaVerdict : गतवर्षी शिवजन्मभूमीतील माती रामजन्मभूमीत नेली होती, वर्षाच्या आत निकाल आला - उद्धव ठाकरे

न्यायव्यवस्थेला माझा दंडवत, बाळासाहेबांची आज आठवण येतेय - उद्धव ठाकरे

मुंबई । ऐतिहासिक अयोध्या खटल्याचा निकाल लागल्यानंतर देशभरात प्रतिक्रियांचा ओघ सुरू झाला आहे. सर्वच स्तरांतून या निकालाचे स्वागत करण्यात येत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही पत्रकार परिषदेत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे स्वागत केले.  उद्धव ठाकरे म्हणाले की, अनेक वर्षांचा लढा संपला याचं मला समाधान आहे. आज बाळासाहेब असते तर त्यांना निश्चितच गर्व वाटला असता. आजच्या निकालाच्या दिवशी बाळासाहेबांची आठवण देशभरातील नागरिकांना येणं स्वाभाविक आहे. कारण तो काळ असा होता जेव्हा या देशात लोक मी हिंदू आहे, हे म्हणायलाही घाबरत होते. तेव्हा बाळासाहेबांनीच सर्वांना गर्व से कहो हम हिंदू है, हा विश्वास दिला. 

ते पुढे म्हणाले की, मला समाधान आहे की वर्षभराच्या आतच निकाल आलाय. गतवर्षी 24 नोव्हेंबरला मी आणि माझे शिवसैनिक अयोध्येला गेलो होतो. तेथे जाण्यापूर्वी मी शिवरायांच्या जन्मभूमीतील शिवनेरीतील मूठभर माती अयोध्येला सोबत नेली होती. महाराष्ट्राची ही चमत्कारिक माती तेथे नेल्याने नक्कीच हा अनेक वर्षांचा लढा लवकरच सुटेल असा मला विश्वास होता. आज 9 नोव्हेंबर आहे. वर्षभराच्या आतच माझा विश्वास सार्थ ठरला. आम्ही सर्व शिवसैनिकांनी तेव्हा शरयु नदीच्या किनारी आरती केली होती. यामुळे आता दोन-तीन दिवसांतच मी शिवनेरीवर शिवरायांना वंदन करायला जाणार आहे. यानंतर 24 तारखेला पुन्हा एकदा अयोध्येला जाणार आहे. माझे सर्वांना आवाहन आहे की, आनंद जरूर करा, परंतु संयतपणे साजरा करा. आजचा जो समजूतदारपणा सर्वजण दाखवत आहेत, तो नेहमी दाखवला तर नक्कीच भारत महाशक्ती होईल, हा विश्वास आहे. AM News Developed by Kalavati Technologies