उत्तर महाराष्ट्र-मराठवाड्यात शरद पवारांची प्रचारतोफ धडाडणार, तर नागपुरात संघ-मुंबईत शिवसेना-भगवानगडावर अमित शहांची

पंकजा मुंडे यांच्या पुढाकाराने भगवान गडावर मेळावा

मुंबई । विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपत असल्याने आज, मंगळवारपासून राज्यात निवडणूक प्रचाराच्या तोफा धडाडणार आहेत. 19 ऑक्टोबरपर्यंत रंगणाऱ्या या प्रचारयुद्धाची सुरुवात शिवसेना दसरा मेळाव्याने करणार असून, भाजपनेही हा मुहूर्त हातातून दवडलेला नाही. राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बीडमधील भगवान गडावर भाजप प्रचाराचा नारळ वाढविणार आहेत.

विधानसभा निवडणुकीत दोन्ही काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी महाआघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज, विजयादशमीच्या मुहूर्तावर दुसऱ्या टप्प्यातील दौरा सुरू होत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सोमवारी मुंबईत देण्यात आली. पहिल्या टप्प्यात शरद पवार हे उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यावर लक्ष केंद्रीत करणार आहेत.

पहिल्या टप्प्यात शरद पवार यांनी उस्मानाबाद, ठाणे, कोल्हापूर असा प्रचार दौरा केला. आता दुसऱ्या टप्प्यात उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात 8 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबरपर्यत ते प्रचारसभा घेणार आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरमध्ये 8 ऑक्टोबर रोजी सकाळी 11. 30 वाजता, पारोळा सायंकाळी 5 वाजता, 9 ऑक्टोबर रोजी विदर्भात अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथे सकाळी 11. 30 वाजता, वाशिम जिल्ह्यातील मानोरा कारंजा दुपारी 4 वाजता, 10 ऑक्टोबर रोजी हिंगणघाट सकाळी 10. 30 वाजता, बुटीबोरी हिंगणा 3 वाजता, काटोल 5 वाजता आदी ठिकाणी जाहीर सभा होणार आहेत असे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सांगण्यात आले.


नागपुरात संघ, मुंबईत सेना, भगवानगडावर अमित शहा

विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवारी संपल्यानंतर मंगळवारी लगेच विजयादशमीनिमित्त नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा, मुंबईत शिवसेनेचा तर भगवानगडावर भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचा असे तीन महत्त्वाचे मेळावे होत असून त्यातून काय राजकीय संदेश दिला जातो यावर पुढील 12 दिवस भाजप व शिवसेना यांच्या महाराष्ट्रातील निवडणूक प्रचाराची दिशा काय असेल हे स्पष्ट होणार आहे.

शिवसेनेचा दसरा मेळावा हा प्रसिद्ध आहे. शिवसेनेची भूमिका काय आणि वाटचाल कोणत्या दिशेने होणार याचे मार्गदर्शन पूर्वी शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे करत. त्यानंतर गेल्या काही वर्षांपासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मनोगत मांडत आहेत. मागच्या वर्षी उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व व राम मंदिरावर भर देत त्या आधारे भाजपशी युती होऊ शकते, असे अप्रत्यक्ष संकेत शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात दिले होते. तर नागपूरच्या दसरा मेळाव्यात सरसंघचालक मोहन भागवत यांनीही राम मंदिरावर भर दिला होता. नंतर त्याच वाटेवर जाऊन भाजप-शिवसेना युती झाली. आता 1989 मध्ये भाजपसह युती झाल्यानंतर शिवसेना प्रथमच धाकटय़ा भावाच्या रूपात सर्वात कमी 124 जागांवर विधानसभा निवडणुकांना सामोरी जात आहे. तशात आरेच्या प्रश्नावरून शिवसेनेने भाजपवर हल्ला चढवण्याचे धोरण अवलंबले आहे. दसरा मेळाव्यातील भाषणाने विधानसभा निवडणुकीतील प्रचाराचा शिवसेनेचा नारळ फुटणार असल्याने उद्धव ठाकरे काय बोलतात याबाबत उत्सुकता आहे. तसेच लक्ष नागपुरात मोहन भागवत काय म्हणतात याकडे राहील.

पंकजा मुंडे यांच्या पुढाकाराने भगवान गडावर मेळावा होत असून निवडणुकीचे निमित्त साधून अमित शहा त्यासाठी येणार आहेत. भाजपची ही पहिलीच प्रचार सभा असून त्यात शहा प्रचाराचा नारळ फोडतील. त्यांच्या भाषणावरूनच प्रचार कशाभोवती फिरणार हे स्पष्ट होईल.AM News Developed by Kalavati Technologies