शरद पवार - उद्धव ठाकरेंची निवडणुकीदरम्यान फोन टॅपिंग; महाराष्ट्र सरकारने दिले चौकशीचे आदेश

याप्रकरणी गृहमंत्र्यांनी तातडीने चौकशी करण्याचे आदेश मुंबई सायबर सेलला दिले आहेत.

मुंबई । महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (राष्ट्रवादी) नेत्यांचे फोन टॅपिंग प्रकरण समोर आले आहे. शुक्रवारी राज्य सरकारने याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. निवडणुकीच्या निकालानंतर सरकार बनवण्याच्या प्रयत्नात ही फोन टॅपिंग करण्यात आली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत या नेत्यांचे फोन टॅप करण्यात आले होते. फोन टॅपिंगची माहिती समोर आल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, मी बाळासाहेब ठाकरे यांचा शिष्य आहे, मी जे काही करतो ते उघडपणे करतो.

यासंदर्भात अधिक माहिती देताना मंत्री अनिल देशमुख म्हणाले की, महाराष्ट्रातील निवडणुकीच्या वेळी गैर-भाजप नेत्यांचे फोन टॅप केले जात होते. आम्ही या गंभीर विषयाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. संजय राऊत यांनी भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याचा हवाला देताना सांगितले की, आपल्याला याबाबत आधीच इशारा देण्यात आला होता.

संजय राऊत यांचे आरोप
राऊत यांनी आपल्या ट्विटर हँडलवर लिहिले की, 'तुमचा फोन टॅप केला जात आहे', असं एका भाजपा सरकारच्या मंत्र्याने फार पूर्वी सांगितलं होतं. मग मी त्याला सांगितले की ज्याला माझे संभाषण ऐकायचे आहे त्यांनी ऐकले पाहिजे. मी बाळासाहेब ठाकरे यांचा शिष्य आहे. मी काहीही लपवत नाही.

संजय राऊत यांच्या व्यतिरिक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचे फोनदेखील टॅप केले जात आहेत. निवडणुकांनंतर जेव्हा सरकार स्थापन करण्यासाठी सर्व प्रमुख पक्षांमध्ये बैठक चालू होती, त्यावेळीही हे प्रकार चालू होते.

महाराष्ट्राचे गृहमंत्री म्हणतात...
याप्रकरणी आता महाराष्ट्राच्या गृह विभागाने चौकशीचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुरुवारी सांगितले की, फोन टॅपिंगची बाब खरी असेल तर ती सरकारी यंत्रणेचा गैरवापर आहे. या प्रकरणाचे गांभीर्य समजून घेऊन तातडीने चौकशी करण्याचे आदेश मुंबई सायबर सेलला देण्यात आले आहेत.

महाराष्ट्राचे गृहमंत्री म्हणाले, 'महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलला चौकशी करण्यास सांगण्यात आले आहे. मागील सरकारच्या काळात ज्यांचा फोन टॅप केला गेला असेल त्याची चौकशी सर्व बाबतींत केली जाईल. विरोधी पक्षनेत्यांच्या तक्रारींच्या प्रकाशात ही चौकशी केली जात आहे. ते पुढे म्हणाले की, पूर्वीच्या सरकारच्या काळात विरोधी पक्षातील नेत्यांचे फोन टॅप करण्यासाठी या यंत्रणेचा गैरवापर झाला यात शंका नाही. त्यावेळी मुंबई सायबर सेलला इस्रायलला अभ्यासासाठी पाठवण्यात आले होते, असा आरोप त्यांनी केला.AM News Developed by Kalavati Technologies