'उपमुख्यमंत्र्याला कोणतेही अधिकार नसतात' महाराष्ट्र विकास आघाडीत 'बिघाडी' होणार?

राष्ट्रवादी उपमुख्यमंत्रीपदामुळे नाराज?

मुंबई | राज्यात सत्ता स्थापनेच्या महानाट्यानंतर अखेर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवत तिन्हीही पक्षांनी एकत्र येत ऐतिहासिक आघाडी केली. यामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा मोठा वाटा होता. शिवसेना आणि काँग्रेसला एकत्र आणण्याची मोठी जबाबदारी पवारांनी पार पाडली. मात्र आता या महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये बिघाडी होणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. याचे कारणही तसेच आहे. एका मुलाखतीत बोलताना शरद पवारांनी एक विधान केले. ते म्हणजे उपमुख्यमंत्र्यांना कोणतेही अधिकार नसतात असे ते म्हणाले. राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपद देण्यात आलं आहे. आता याचा नेमका अर्थ काय हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

मागच्या आठवड्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यानंतर विधानसभेत महाराष्ट्र विकास आघाडीनं बहुमतही सिद्ध केले आहे. सरकार सुरळीतपणे चालवण्यासाठी तिन्ही पक्षांनी किमान समान कार्यक्रमदेखील आखला आहे. यामध्ये शिवसेनेकडून मुख्यमंत्रीपद, काँग्रेसकडे विधानसभा अध्यक्ष आणि राष्ट्रवादीकचे उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलं आहे. मात्र उपमुख्यमंत्रिपदावरुन शरद पवारांनी केलेल्या विधानामुळे येत्या काही दिवसांत महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीला मंत्रिपदांच्या वाटपात काय मिळालं, असा सवाल शरद पवार यांना मुलाखतीत विचारण्यात आला. यावर बोलताना ते म्हणाले की, 'राष्ट्रवादीकडे शिवसेनेपेक्षा केवळ दोन आमदार कमी आहेत. मात्र आमच्या आमदारांची संख्या काँग्रेसपेक्षा दहानं जास्त आहे. शिवसेनेकडे मुख्यमंत्रिपद आहे. तर काँग्रेसकडे विधानसभा अध्यक्षपद आहे. मात्र माझ्या पक्षाला काय मिळालं? उपमुख्यमंत्र्यांकडे कोणतेही अधिकार नसतात,' असं पवारांनी म्हणाले आहेत. मंत्रिपदांच्या वाटपात राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपद मिळालं असलं तरीही पक्षानं अद्याप यासाठी कोणाचंही नाव निश्चित केलेलं नाही. 



AM News Developed by Kalavati Technologies