सातारा | पालकमंत्र्यांच्या हस्ते क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालयात कोरोना टेस्टींग लॅबचे उद्घाटन

लॅबमुळे कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तीचा अहवाल 24 तासाच्या आत मिळणार असून रुग्णावर वेळेत उपचार करण्यास मोठी मदत होणार असल्याचं पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितलं आहे.

सातारा | शहरातील येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात कोरोना टेस्टींग लॅब उभारण्यास शासनाने परवानगी दिली होती. यानुसार अत्याधुनिक अशी लॅबची उभारणी करण्यात आली आहे. या लॅबचे उद्धाटन आज पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या उद्घाटन प्रसंगी गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध आठल्ये आदी उपस्थित होते.

साताऱ्यात मध्यवर्ती ठिकाणी कोरोना टेस्टींग लॅब असावी अशी सर्वांची इच्छा होती. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात लॅबच्या उभारणीचा प्रस्तावाला शासनाकडून मान्यता आणि निधीची पूर्तता झाल्यानंतर आज कोरोना टेस्टींग लॅबचे उद्घाटन झाले. कालच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कराड मध्ये आज पासून लॅब कार्यान्वित होईल असे सांगितले होते. या लॅबममधून रोज 380 जणांचे नमुने तपासले जाणार असून यामध्ये आणखीन वाढ करण्यासाठी प्रयत्न केले जातील. या लॅबमुळे कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तीचा अहवाल 24 तासाच्या आत मिळणार असून रुग्णावर वेळेत उपचार करण्यास मोठी मदत होणार आहे, असे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी यावेळी सांगितले.AM News Developed by Kalavati Technologies