सलमान खानच्या बंगल्यातील ‘वाँटेड’ गुन्हेगाराला बेड्या, 15 वर्षांपासून होता गायब

मुंबई येथील वरळी येथे 1990मध्ये घडलेल्या एका घटनेत शक्ती राणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या.

मुंबई | मुंबई पोलिसांनी सलमान खानच्या बंगल्यातून एका अट्ट्ल गुन्हेगाराला अटक केली आहे. सलमान खानच्या गोराई येथील बंगल्यामध्ये हा आरोपी केअर टेकर म्हणून काम करत होता. शक्ती सिद्धेश्वर राणा असे त्याचे नाव आहे. राणा हा गेल्या 15 वर्षांपासून या बंगल्यात नोकर म्हणून राहात होता. त्याच्यावर चोरी आणि मारहाणीचा आरोप होता. शक्ती हा 29 वर्षांपूर्वी घडलेल्या एका घटनेतला आरोपी आहे. फिल्मी स्टाईल तपास करून पोलिसांनी त्याला अटक केली. 

अगदी सिनेम्यात शोभेल अशी ही घटना आहे. मुंबई येथील वरळी येथे 1990मध्ये घडलेल्या एका घटनेत शक्ती राणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. त्याच्यावर एका घरात घुसून मारहाण करणं आणि सामान लुटून नेणे असे काही आरोप होते. यानंतर न्यायालयाकडून त्याला जामीन मिळाला. तेव्हापासून तो कधीच सुनावणीसाठी हजर राहिला नाही. पोलीस तेव्हापासून त्याचा शोध घेत होते.

पोलिसांनी या प्रकरणाचा शोध पुढे सुरू ठेवला. मात्र फरार झालेला शक्ती सापडलाच नव्हता. काही खबऱ्यांच्या माध्यमातून पोलिसांना शक्तीविषयी माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी हे जुने प्रकरण बाहेर काढले. 29 वर्षे जुनं प्रकरण पुन्हा बाहेर आल्यानंतर शोधमोहिम सुरू करण्यात आली. यावेळी गोराई येथे त्याचा शोध घेत असताना तो एक बंगल्यात सापडला. त्याची चौकशी करण्यात आल्यानंतर हा सलमान खानच्या बंगल्याचा केअर टेकर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तो येथे आपली खरी ओळख लपवून केअर टेकर म्हणून राहत होता. आता पोलीस आणखी चौकशी करत असून शक्ती इतर कुठल्या गुन्ह्यांमध्ये सहभागी आहे का याचा शोध घेत आहेत.AM News Developed by Kalavati Technologies