निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रातील जनतेला दिलासा, वाहन कायद्याबाबत मोठा निर्णय

नव्या कायद्याबाबत केंद्र सरकारसोबत पत्रव्यवहार करण्यात आल्याची माहिती

मुंबई । केंद्राच्या मोटार वाहन कायद्याला राज्यात तुर्तास स्थगिती देण्यात आली, असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी पत्रकार परिषद घेऊन नवीन मोटार परिवहन कायद्याला राज्यात तूर्तास स्थगिती देत असल्याचं जाहीर केलं. या नव्या कायद्याबाबत केंद्र सरकारसोबत पत्रव्यवहार करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. राज्यात विधानसभा निवडणुका कोणत्याही क्षणी लागण्याची चिन्हे असल्याने विरोधकांच्या हाती आयते कोलीत न देण्यासाठी राज्यात या कायद्याला तूर्तास स्थगिती देण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.

खबरदारी म्हणून राज्यात केंद्राचा कायदा लागू करण्यास तूर्तास स्थिगिती देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. केंद्राने मोटार वाहन कायदा लागू केला आहे. पण या कायद्यात फेरबदल करण्याचे आधिकार राज्य सरकारला दिले आहेत. कालच गुजरात राज्याने मोटार वाहन कायद्यातील दंडाची रक्कम कमी करून आपल्या राज्यातील नागरिकांना दिलासा दिला होता.

नव्या नियमांसंदर्भातील दंडात्मक रक्कमेबद्दल फेरविचार करण्यासंदर्भात राज्य सरकारने नितीन गडकरी यांना पत्र पाठवले आहे. केंद्राकडून उत्तर मिळाल्यानंतर राज्य सरकार नव्या नियम लागू करण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. यापूर्वी केंद्र सरकारकडून वाहन-वाहतूक ऍक्टमध्ये दुरुस्ती केल्यानंतर अवघ्या 10 दिवसांत गुजरात सरकारने दंडाच्या रकमेत मोठी कपात करण्याचा निर्णय घेतला होता. वाहतूक नियमांच्या उल्लंघनावर केंद्राने वाढवलेल्या दंडाची रक्कम राज्य सरकारने 25 ते 90 टक्क्यांनी कपात केली आहे. मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी यासाठी मानवीय अधिकाराचे कारण सांगितले होते.AM News Developed by Kalavati Technologies