नवी दिल्ली । प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅली दरम्यान लाल किल्ल्यावर धार्मिक झेंडा लावणारा आरोपी दीप सिध्दूला दिल्ली पोलीसांनी अटक केली आहे. तीन फेब्रुवारी रोजी दिल्ली पोलीसांनी दीप सिध्दूवर एक लाख रुपयाच्या बक्षिसाची घोषणा केली होती. त्यानंतर सोशल मीडियावर व्हिडीओ जारी झाल्यानंतर सिद्धूने तपासणी पथकाला स्वत: हजर होणार असल्याचं वक्तव्य त्यांनी केला होता. दीप सिद्धूवर हिंसा पसरवण्याचा आरोप आहे. ट्रॅक्टर रॅली दरम्यान दिल्लीत प्रवेश करून लाल किल्ल्यावर सिद्धू यांनी झेंडा फडकवला होता.
दरम्यान, दिल्लीत प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅली दरम्यान लाल किल्ल्यावर वेगळाच ध्वज फडकविल्याप्रकरणी अभिनेता दीप सिद्धू, जुगराज सिंगसह इतर दोन आरोपींचा दिल्ली पोलीस शोध घेत होते. या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी एसआयटीची स्थापना केली असून, सर्व आरोपींवर प्रत्येकी एक-एक लाखांचं बक्षीस जाहीर केलं होतं. त्याशिवाय इतर काही आरोपींवर प्रत्येकी 50-50 हजार रुपयांचं बक्षीस ठेवण्यात आलं होतं. 26 जानेवारी रोजी ट्रॅक्टर मार्च दरम्यान हिंसा भडकली होती. त्याचा तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. ज्वॉइंट कमिशनर बी. के. सिंह यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटीची टीम तपास करणार आहे. या टीममध्ये तीन डीसीपींचा समावेश करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी आरोपी जयबीर सिंह बूटा सिंह सुखदेव सिंह आणि एकबाल सिंह यांच्या वर 50,000 रुपये तर दीप सिद्धू आणि जुगराज सिंह यांच्या वर एक लाख रुपयांचे बक्षिस घोषित करण्यात आले आहे.