महाराष्ट्रासाठी कितीही वेळा तुरुंगात जाण्यास तयार - आमदार प्रताप सरनाईक

कंगणा आणि शिवसेनेत ट्विटर युद्ध सुरूच असून, थोबाड फोडण्याच्या विधानावर मी ठाम असल्याचं सरनाईक यांनी स्पष्ट केलं आहे.

मुंबई । अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणात आक्रमक झालेली अभिनत्री कंगणा रणौत सध्या चर्चेचा विषय बनत आहे. कंगणानं मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यानंतर राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणात पेटले आहे. कंगणाचं सतत ट्विटर युद्ध सुरूच असून, या युद्धात आता आमदार प्रताप सरनाईक यांनी उडी घेतली आहे. कंगणा मुंबईत आल्यावर तिचं थोबाड फोडू असे विधान सरनाईक यांनी केले होते. त्यानंतर या प्रकरणात राष्ट्रीय महिला आयोगाने दखल घेतली. मात्र तरीही आपण आपल्या भुमिकेवर ठाम असल्याचं प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलं आहे.

त्यांनी ट्विट करत सांगितले आहे की, "भाजपने राष्ट्रीय महिला आयोगाला हाताशी धरून मला अटक करायचा खेळ रचला आहे. पण लक्षात ठेवा, मुंबई आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी मला कितीही वेळा तुरुंगात जावे लागले तरी मी तयार आहे" अशी भुमिका सरनाईक यांनी व्यक्त केली आहे. "मी माझ्या विधानावर ठाम आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत १०६ वीरांनी पत्करलेल्या हौतात्म्यामुळे मुंबई महाराष्ट्राला मिळाली. त्या मराठी माणसाच्या रक्त सांडून मिळवलेल्या मुंबई बद्दल कोणीही काहीही बोलेल तर खपवून घेणार नाही" असं सरनाईकांनी ट्विट करत सांगितले आहे. त्यामुळे शिवसेना वर्सेस कंगणा हा वाद काही दिवस तरी कायम असणार हे स्पष्ट झालं आहे.AM News Developed by Kalavati Technologies