साखर कारखानदारांना मदत करता, मग शेतकऱ्यांसाठी आखडता हात का? राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना सवाल

परतीच्या पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले असून, आज राजू शेट्टी पिकांची पाहणी करण्यासाठी पंढरपूरच्या दौऱ्यावर आहेत

पंढरपूर । राज्यात अतिवृष्टी आणि महापूरामुळे शेतीचं मोठं नुकसान झाले आहे. नुकसान भरपाई म्हणून राज्य आणि केंद्र सरकारने शेतकऱ्यांना 50 हजार कोटींची मदत जाहीर करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली आहे. सरकारकडे साखर कारखानदारांना देण्यासाठी पैसे आहेत. पण शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकार आखडता हात का करीत आहे? असा सवाल राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना केला आहे.

शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रूपयांची आर्थिक मदत करा अन्यथा आघाडी सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशाराही शेट्टी यांनी दिला आहे. शेतकऱ्यांना मदत देण्यावरून महाविकास आघाडी सरकार आणि शेट्टी यांच्यात पुन्हा संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. पंढरपूर आणि परिसरात अतिवृष्टी झाली आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शेट्टी आज पंढरपूर दौऱ्यावर आले आहेत.

आज त्यांनी चिंचोली भोसे, भटुंबरे आदी ठिकाणी जाऊन नुकसानीची पाहणी केली. त्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी बोलताना केंद्र सरकारवरनेही राज्याला मदत करावी अशी मागणी केली. यावेळी शेट्टी म्हणाले, उध्दव ठाकरे यांनीच शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रूपयांची मदत करू अशी घोषणा केली होती. आता ते स्वतः मुख्यमंत्री असून, आता त्यांनीच मदत जाहीर करावी. असे शेट्टी म्हणाले. साखर कारखानदारांना थकहमी देण्यासाठी सरकारकडे कोट्यावधी रूपये आहेत. मात्र संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत ही शेतकऱ्यांची शोकांतिका तर सरकारचे अपयश आहे.

राज्य सरकारने केंद्राकडे बोट न दाखवता, राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना मदत करावी. जागतिक तापमान वाढीमुळे अतिवृष्टी झाली आहे. केंद्र सरकारने कायम स्वरूपी मदत करण्यासाठी आपत्ती निवारणासाठी स्वतंत्र फंड तयार करावा. तसेच चंद्रभागेला आलेल्या महापूरास पाटबंधारे विभागाचे अधिकारी जबाबदार आहेत. या अधिकाऱ्यांची चौकशी करावी अशी मागणी ही शेट्टी यांनी केली.AM News Developed by Kalavati Technologies