राजनाथ सिंह,स्मृती इराणी, फडणवीस, पवार, शाहांसह दोन्ही ठाकरेंचा आज प्रचारसभांचा झंझावात

कोणाची कोठे सभा जाणून घ्या...

मुंबई | विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. सर्वच पक्षांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. उमेदवारही निवडणूक प्रचाराच्या घोडदौडीत सक्रीय झाले आहेत. राजकीय नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. मतदारांना आश्वासनांची खैरात दिली जातेय. महाराष्ट्रातील सर्वच दिग्गज नेत्यांनी आता महाराष्ट्रभर दौरे करण्यास सुरुवात केली आहे.

राज्यभरात ठिकठिकाणी प्रचारसभांचा झंझावात सुरू आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, मंत्री स्मृती इराणी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ या सर्वच नेत्यांच्या धडाकेबाज प्रचारसभा आज होणार आहेत.

उद्धव ठाकरे हे धाराशीव, परांडा, बार्शी, करमाळा, सांगोला, मोहोळ, सोलापूर याठिकाणी युतीच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतील. तर आदित्य ठाकरेही वाशीम जिल्ह्यातील रिसोडमध्ये सभा घेतील त्यानंतर भांडूप आणि दिंडोशीमध्ये त्यांची सभा होईल..

भाजपकडून राजनाथ सिंह, योगी आदित्यनाथ, स्मृती इराणी, जे. पी. नड्डा आणि केंद्रीय राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती असे दिग्गज प्रचारासाठी राज्य पिंजून कढणार आहेत. राजनाथ सिंह यांच्या आज मुंबईत तीन सभा आहेत तर योगी आदित्यनाथ यांच्या पुणे, नाशिक, औरंगाबाद आणि नागपुरात एकून चार सभा होणार आहेत. स्मृती इराणी आज पुणे, सांगली आणि इंदापुर इथं तीन घेतील तर केंद्रीय राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योतींची सटाण्यात एक सभा होईल. केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांच्याही आज दोन सभा होणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसही पूर्ण ताकतीनिशी प्रचारात उतरलीये. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आज तीन प्रचारसभा आहेत. मराठवाड्यातील कन्नड आणि वैजापुरात तसंच कोपरगावमध्ये एक सभा होणार आहे. तर अमोल कोल्हे यांच्या आज तीन सभा होणार असून पाटण तालुक्यातील तळमावले, डिस्कळ तालुक्यातील खाटाव आणि कोरेगाव उत्तरमधील सभेतून ते राष्ट्रवादीसाठी मतांचा जोगवा मागतील. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आज रोहित पवार यांच्यासाठी नान्नज येथे एक प्रचार सभा घेतील. तर धनंजय मुंडे बाजार सावंगी इथे सभा घेतील. 

वंचित बहुजन आघाडीही हळूहळू प्रचारात जोर धरु लागलीये. वंचित बहुजन आघाडीची परभणी, मुंबई आणि औरंगाबादत आज सभा होत आहे. मुंबईतील सोमय्या मैदानावरयासाठी जैय्यत तयारी करण्यात आली. तर विधानसभा निवडणुकीसाठी बसपाप्रमुख मायावती यांची पहिलीच सभा आज नागपुरातही होणार आहे. AM News Developed by Kalavati Technologies