Rain Update: मुंबईसह राज्यातही आज मुसळधार पावसाचा इशारा...

मध्य रात्रीपासून पावसाचा जोर कमी झाला असून, आजही मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे

मुंबई । मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस होत असून, आजही पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात पाणी साचले आहे. मुंबईसह अनेक उपनगरांमध्ये रस्ते आणि गाड्या पाण्याखाली गेल्या आहे. अनेक रेल्वे स्थानकांत मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. या दोन दिवसाच्या पावसाने तब्बल 46 वर्षांचा विक्रम मोडला आहे. मुंबईसह, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांत आणि महाराष्ट्रातील घाट भागात अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

तसेच हवामान विभागाकडून रेड अलर्टसुद्दा जारी करण्यात आला आहे. कोकण, गोव्यात काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे वाहतुक ठप्प झाली असून मुंबईचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे मंत्रकाय, चर्चगेट, मुंबई विद्यापीठ आणि न्यायालयाचा परिसर जलमय झाला होता. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. कल्याण डोंबिवलीमध्येही आज सकाळीपासून पावसाची रिपरिप सुरू आहे.

काल रात्रभर पडत असलेल्या पावसाने शहरात काही ठिकाणी पाणी जमा झाले आहे. परंतु सकाळी पाऊस कमी झाल्याने पाण्याचा निचरा होऊ लागला आहे. अधून-मधून जोर धरत असलेल्या पावसामुळे शहरातील काही भागांमध्ये पुन्हा पाणी भरू लागले आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार कल्याण डोंबिवलीमध्ये मागील 24 तासात सरासरी 42 मिली इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. अशात मध्य रात्रीपासून पावसाचा जोर जरा कमी झाला असला तरी आजही मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.AM News Developed by Kalavati Technologies