कोरोनाबाधितांच्या संपर्कातील व्यक्तींना क्वारंटाईन करा, उपविभागीय अधिकारी ढोले यांची सूचना

ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव होत असल्याने, संपर्कात आलेल्या व्यक्तींना विलगीकरण करण्याचे आवाहन

पंढरपूर । हरासह तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्माक उपाय योजनांमध्ये वाढ करावी. तसेच कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची शोध घेऊन त्यांना तात्काळ संस्थात्मक क्वारंटाईन करुन त्यांची कोरोना चाचणी घ्यावी, अशा सूचना प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिल्या. पंढरपूर तालुक्यात कोरोना प्रतिबंधासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनेबाबत नवीन भक्तनिवास येथे बैठक घेण्यात आली.

बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सागर कवडे, तहसिलदार डॉ.वैशाली वाघमारे, गटविकास अधिकारी रवीकिरण घोडके, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले, उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अध्यक्षिका डॉ.जयश्री ढवळे, उप कार्यकारी अभियंता हनुमंत बागल, न.पा चे उपमुख्य अधिकारी सुनिल वाळुंजकर, डॉ.सरोदे आदी उपस्थित होते. ढोले म्हणाले, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी संपर्कातील व्यक्तींना तात्काळ संस्थात्मक विलगीकरण करावे. संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यासाठी वार्डस्तरीय व ग्रामस्तरीय समिती तसेच पोलीस प्रशासनाने समन्वायाने काम करावे. यामध्ये नवीन रुग्णांची भर पडणार नाही याची दक्षता घ्यावी.

नगरपालिकेने शहरातील मठांचे, तसेच शहरालगत असणाऱ्या ग्रामपंचायतीने मठांचे, शाळांचे अधिग्रहण करण्याबाबत नियोजन करावे. ताब्यात घेतलेल्या मठांचे व शाळांचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करण्यात यावे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सनियंत्रण समितीची स्थापना करावी. क्वारंटाईन केंद्रावर उपचारासाठी दाखल असेलेल्या रुग्णांना जेवणाचा तसेच तेथे आवश्यक असणाऱ्या साहित्याचा पुरवठा बांधकाम विभागाने करावा. आरोग्य विभागाने आरोग्य कर्मचारी यांना आवश्यक ते प्रशिक्षण द्यावे. रुग्णालयात तपासणीसाठी आलेल्या इतर आजारांच्या रुग्णांकडे दुर्लक्ष होणार नाही याची दक्षता आरोग्य विभागाने घ्यावी.

कोरोनाची रुग्ण संख्या वाढू नये, यासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी करावी असेही ढोले यांनी सांगितले. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे नागरिकांनी पालन करावे. अलगीकरणातील व्यक्तींबाहेर फिरताना तसेच अनावश्यक गर्दी करणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई कारवाई करण्यात येणार असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सागर कवडे यांनी सांगितले.

यावेळी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शहरी व ग्रामीण भागात करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती गटविकास अधिकारी रवीकिरण घोडके व मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी दिली. कोरोनाबाधित रुग्ण, कोरोनामुक्त झालेले रुग्ण तसेच कोरोना संसर्ग विषयक सद्यस्थिती, आरोग्य सुविधा आणि उपलब्ध सामग्रीबाबत माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले व उपजिल्हा रुग्णालयांच्या वैद्कीय अध्यक्षिका डॉ.जयश्री ढवळे यांनी दिली.AM News Developed by Kalavati Technologies