पाकिस्तानचा मोठा कट उधळण्यात पंजाब पोलिसांना यश, जवानासह तिघांना अटक

अटक करण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये एका जवानाचा देखील समावेश आहे.

चंदिगड | पाकिस्तानचा मोठा कट उधळून लावण्यात पंजाब पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांकडून जवानांसह तीन जणांना अटक करण्यात आली आहे. भारत-पाकिस्तान सीमेवरून जीपीएस आधारीत ड्रोनच्या मदतीने अंमली पदार्थ आणि शस्त्रांची तस्करी केली जात होती. पोलिसांना याविषयी माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी मोठी कारवाई करत तिघांना ताब्यात घेतले आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून चीनी बनावटीचे दोन ड्रोन, 12 ड्रोन बॅटरी, ड्रोन कंटेनर, इन्सास रायफल काडतूसे, दोन वॉकी-टॉकी सेट, मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थासह सहा लाख 22 हजार रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. पंजाबचे पोलीस महासंचालक दिनकर गुप्ता यांनी याविषयी माहिती दिली. तसेच पत्रकार परिषदेत या सर्व वस्तूंचे फोटोही दाखवण्यात आले आहेत.

अमृतसर आणि करनाल येथून दोन ड्रोन जप्त केले गेले. एका आरोपीचा सध्या शोध सुरू असल्याची माहिती दिनकर गुप्ता यांच्याकडून देण्यात आली. अटक करण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये एका जवानाचा देखील समावेश आहे. राहुल चौहान असे त्या जवानाचे नाव आहे. तो भारतीय लष्करात नायक हुद्यावर काम करत होता. अंमली पदार्थांच्या तस्करीसोबतच पिस्तूल आणि अन्य छोट्या शस्त्रांची तस्करी ड्रोनने झाली असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. राहुल चौहान ड्रोनचा वापर करण्याचे प्रशिक्षण द्यायचा अशी माहिती समोर आली आहे. या प्रकरणामध्ये अमृतसरमधील धनोआ कुर्द गावातील धर्मेंद्र सिंग आणि अमृतसर जिल्ह्यातील बालकर सिंग यांना अटक करण्यात आली आहे.AM News Developed by Kalavati Technologies