लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदी यांचे भाषण- 70 वर्षांत जे झाले नाही ते आम्ही 70 दिवसांत करून दाखवले

भारतीय जनतेला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत मोदींनी आपल्या भाषणाला सुरुवात केली

नवी दिल्ली | 73 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लाल किल्ल्यावर तिरंगा झेंडा फडकवला. मोदी सरकारच्या दुसर्या टर्ममधील हा पहिलाच स्वातंत्र्यदिन आहे. त्यामुळे दुसर्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर मोदींचे हे लाल किल्ल्यावरील पहिले भाषण आहे.

भारतीय जनतेला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत मोदींनी आपल्या भाषणाला सुरुवार केली. त्यांनी आपल्या भाषणात ट्रिपल तालक आणि कलम 370 चा देखील उल्लेख केला. कलम 370 आणि 35A हटविल्याने आपण सरदार पटेल यांच्या अखंड भारतच्या दिशेने वाटचाल सुरु केल्याचे सांगितले. आम्ही समस्या टाळत नाही. सरकार बनल्यानंतर केवळ 100 दिवसांच्या आत आम्ही कलम 370 व 35A हटविल्याचे मोदी यांनी सांगितले.

UPDATES

 • संपत्ती निर्मिती करणारे या देशाची संपत्ती आहेत. संपत्ती निर्मितीदेखील देशाच्या विसाकासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
 • स्थिर सरकार, स्थिर प्रशासन असेल तर जग आपल्यावर विश्वास ठेवेल. देशातील पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार मोठ्या प्रमाणावर काम करणार.
 •  आधुनिक पायाभूत सुविधांसाठी १०० लाख कोटींची गरज. गेल्या ५ वर्षांत आम्ही ३ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था केली, आता ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं लक्ष्य आहे.
 •  लोकांच्या अपेक्षा वर्षानुवर्षे वाढत राहणार आणि त्यापूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. गेल्या ५ वर्षांत रोज एक कायदा रद्द केला, जे कायदे कालबाह्य झाले त्यांना हद्दपार केलं.
 • भ्रष्टाचार करणाऱ्या काही बड्या अधिकाऱ्यांना आम्ही घरी बसवलं. भ्रष्टाचाराविरोधात आम्ही मोठं काम केलं, यापुढे तंत्रज्ञानाचा वापर करून भ्रष्टाचाराचा समूळ नायनाट करू.
 • आधी लोक साध्या डांबरी रस्त्याचं स्वप्न पाहायचे, आता चौपदरी-सहापदरी रस्त्याची स्वप्नं पाहतात. 
 • सरकारी कामं लवकरात लवकर व्हावीत यासाठी कटिबद्ध असल्याचे मोदी म्हणाले. व्यवसाय सुलभीकरणासाठी सरकारचे प्रयत्न सुरू.
 • कुटुंब नियोजन करणं म्हणजे देशाच्या विकासात योगदान देणं. लोकसंख्या वाढीमुळे इतर समस्या वाढतात. वाढती लोकसंख्या देशासमोरील गंभीर समस्या आहे.
 •  पाणी वाचवण्यासाठी सरकार अभियान चालवणार; जलसिंचन, जलसंचय वाढवण्यावर भर देणार. केंद्र आणि राज्य एकत्र करून ३.५ लाख कोटी 'जल जीवन मिशन' योजनेवर खर्च करणार. प्रत्येक घरात पिण्याचं पाणी देण्यासाठी सरकार कटिबद्ध. 'जल जीवन मिशन' घेऊन सरकार काम करणार.
 • देशाने 'एक देश, एक निवडणुकीवर' विचार करायला हवा. जीएसटीमुळे 'वन नेशन, वन टॅक्स' करण्यात यश. कलम ३७० रद्द झाल्यामुळे 'एक देश, एक संविधान' आज प्रत्यक्षात उतरलं.
 • कलम ३७० बाबत राजकारण नाही तर देशाचं भविष्य महत्त्वाचं. काश्मीरमध्ये कलम ३७० इतकं महत्त्वाचं होतं मग गेल्या ७० वर्षांत ते कायमस्वरुपी रुप का नाही दिलं? जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याचा ऐतिसासिक निर्णय घेण्याचं धाडस आम्ही दाखवलं.
 • तिहेरी तलाकची भीती मुस्लिम महिलांच्या मनातून हद्दपार केली. सतीप्रथेविरोधात, स्त्रीभ्रूण हत्येविरोधात कायदा आपण केला, मग मुस्लिम महिलांना जाचक ठरणाऱ्या तिहेरी तलाकवर कायदा करणंही जबाबदारी होती. लोकांचा विश्वास प्राप्त करण्यात सरकार यश आलं.
 • २०१९ ची निवडणूक फक्त मोदी नाही संपूर्ण देश निवडणूक लढवत होता. २०१९ मध्ये देशवासियांच्या आशांना नवे पंख मिळाले, देश बदलू शकतो याचा विश्वास जनतेमध्ये आला. तिहेरी तलाक विधेयक संमत करून मुस्लिम महिलांना अनिष्ट प्रथेतून मुक्त केलं.
 • सरकार आल्यानंतर अवघ्या १० आठवड्यांत कलम ३७० हटवलं. काश्मीरमधून कलम ३७० आणि ३५ अ हटवल्यानं सरदार वल्लभभाई पटेलांचं स्वप्न पूर्ण झालं. देशातील पूरग्रस्तांच्या दु:खात सहभागी.
 • पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाला सुरुवात, मोदींनी स्वातंत्र्य दिनाच्या आणि रक्षाबंधनच्या दिल्या देशवासियांना शुभेच्छा दिल्या. तत्पूर्वी, पंतप्रधान मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण झालं. लाल किल्ल्यावर पंतप्रधान मोदींना सेनेच्या तिन्ही दलांकडून अभिवादन. पंतप्रधान मोदी राज घाटावर महात्मा गांधींच्या स्मृतिस्थळाला अभिवादन केलं.


AM News Developed by Kalavati Technologies