नागपूरात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, 8 तासातच आरोपींना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश

आरोपी हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून त्यांच्यावर याआधीही गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे.

नागपूर |  जिल्ह्यातील नवीन कामठी पोलीस स्टेशन अंतर्गत एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली होती. याप्रकरणी 8 तासातच आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. शेख अन्वर असे मुख्य आरोपीचे नाव असून त्याच्यासह दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

नागपूरच्या कळमना वसाहतीत राहणारी सोळा वर्षीय मुलगी ही मित्रांसह मंगळवारच्या संध्याकाळी नवीन कामठी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या रणाळा-भिलगाव पांधन रस्ता असलेल्या लक्की बियर बारच्या मागे निर्जन स्थळावर एकांतात फिरायला गेले होते. संध्याकाळी साडेसातच्या सुमारास 32 वर्षीय शेख अन्वर त्याच्या दोन साथीदारांसह अल्पवयीन मुलीजवळ आले व त्यांनी दोघांनाही मारहाण करण्यास सुरुवात केली. धाक-दपट करीत दोघांजवळचे मोबाईल फोन, पैसे व काही वस्तू हिसकावून घेतल्या. त्यानंतर अंधाराचा फायदा घेत पीडित मुलीला नजीकच्या झुडुपात नेऊन अत्याचार केला. घटनेनंतर आरोपी घटनास्थळहून पळून गेले. रात्री पीडित मुलगी घरी गेल्यावर घडलेला प्रकार कुटुंबियांना सांगितला. कुटुंबीयांनी घटनेची तक्रार पोलिसांना दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ तपास सुरू केला. ज्यामुळे घटनेच्या 8 तासातच पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या. आरोपी हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून त्यांच्यावर याआधीही गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे.AM News Developed by Kalavati Technologies